सामना अग्रलेख – आता देवलोकी मैफील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी शिवाजी पार्कच्या मैदानावर तिरंग्यात लपेटलेल्या लतादीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन साऱया जगाने घेतले. सैन्य दलाने बिगुलावर वाजवलेली शोकमग्न धूनही साऱ्यांनी ऐकली… मंत्रोच्चारात पेटलेली चिताही उघडय़ा डोळ्यांनी पाहिली. पोलिसांनी अखेरची मानवंदना म्हणून झाडलेल्या बंदुकीच्या फैरींचा कानठळ्या बसविणारा आवाजही अजून कानात घुमतो आहे… पण मन मात्र यापैकी काहीएक मानायला तयार नाही. कारण एकच, लता मंगेशकर अजूनही मनामनांत, कानाकानांत आणि प्रत्येकाच्या रोमारोमांत जिवंत आहेत.

लतादीदी अनंतात विलीन झाल्या हे अजूनही कुणाच्या मनाला का पटत नाही? लता मंगेशकर हे जग सोडून गेल्या, हे मान्य करायला अजूनही मन का धजावत नाही? ते मान्य करावे तरी का? दीदींनीच गायलेल्या
‘अनाडी’मधील गाण्याच्या शब्दांत सांगायचे तर

‘तेरा जानाss दिल के अरमानो का लूट जाना…’

आलम् दुनियेची आज अशीच अवस्था झाली आहे. गानसम्राज्ञी लतादीदींच्या ओठांवर, जिव्हेवर आणि कंठातही साक्षात सरस्वतीचेच वास्तव्य होते. त्याशिवाय का हा दैवी सूर एवढा लोकप्रिय झाला, रसिकांच्या हृदयांत विसावला! रविवारी सकाळी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला, त्याच्या आदल्याच दिवशी देशभरात वसंत पंचमीचा सण साजरा झाला. वसंत पंचमी म्हणजे कला आणि विद्येची स्वामिनी असलेल्या सरस्वती मातेच्या आगमनाचा पवित्र दिवस. त्याच्या दुसऱयाच दिवशी ठिकठिकाणी सरस्वती देवीला निरोप देऊन विधीवत विसर्जन केले जाते. वीणावादन करत धरतीवर अवतीर्ण झालेल्या माँ सरस्वतीचे पूजन-अर्चन करून निरोप देण्याची तयारी देशभरातील श्रद्धाळू जनता करत असतानाच लतादीदी नावाचा पृथ्वीतलावरील साक्षात सरस्वतीचा अवतारही अंतर्धान पावला. जणू आपल्या लाडक्या कन्येला निजधामी नेण्यासाठी साक्षात सरस्वतीच स्वर्गलोकातून भूलोकी अवतरली आणि त्रिखंडाला जिंकून घेणाऱया लेकीसह अदृश्य झाली. अनंताच्या प्रवासाला निघालेली ही गानकोकिळा निःसंशय स्वर्गलोकी पोहचेल, तेव्हा तिच्या स्वागतासाठी समस्त देवादिक हात जोडून उभे असतील. स्वर्गातील पहिल्या मैफिलीची तयारीही पूर्ण झाली असेल. नऊ दशकांसाठी पृथ्वीवर पाठविलेला स्वर्गीय सूर कित्येक वर्षांनी ऐकायला मिळणार म्हणून 33 कोटी देवांचे कान आतुर झाले असतील. 13 वर्षांच्या लाडक्या कन्येला पोरकी करून देवलोकी गेलेले मास्टर दीनानाथ लतेचा मंजूळ स्वर साठवून ठेवण्यासाठी

कानांत प्राण आणून

वाट पाहत असतील. पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, रविशंकर यांच्या बरोबरीने मोहंमद रफी, मुकेश, तलत मेहमूद, किशोरदा ही गायक मंडळी पुन्हा एकदा लताचा स्वर ऐकायला मिळेल म्हणून आनंदली असतील. उत्तम साथसंगत करण्यासाठी आधीच जाऊन पोहचलेले मदन मोहन, नौशाद, खय्याम, गुलाम महंमद, शंकर जयकिशन, श्रीनिवास खळे, वसंत प्रभू या संगीतकार मंडळींनीही वाद्यवृंद सज्ज ठेवला असेल. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…’ हे आपले अजरामर गीत पुन्हा एकवार ऐकण्यासाठी खुद्द तात्याराव सावरकरही एका तळमळीने वाट पाहत असतील. लतादीदींचा अमृतमयी स्वर म्हणजे पृथ्वीतलावरील प्रत्येकाला आपलीशी वाटणारी अद्भुत दौलत. या मौलिक ठेव्यावर पहिला अधिकार आहे तो भूलोकातील लतादीदींच्या रसिक चाहत्यांचा आणि श्रोत्यांचा. लता मंगेशकर अमर आहेत त्या यामुळे. देवादिकांनी नव्हे तर रसिकांनी त्यांना हे अमरत्व बहाल केले आहे. रविवारी शिवाजी पार्कच्या मैदानावर तिरंग्यात लपेटलेल्या लतादीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन साऱया जगाने घेतले. सैन्य दलाने बिगुलावर वाजवलेली शोकमग्न धूनही साऱयांनी ऐकली… मंत्रोच्चारात पेटलेली चिताही उघडय़ा डोळ्यांनी पाहिली. पोलिसांनी अखेरची मानवंदना म्हणून झाडलेल्या बंदुकीच्या फैरींचा कानठळ्या बसविणारा आवाजही अजून कानात घुमतो आहे… पण मन मात्र यापैकी काहीएक मानायला तयार नाही. कारण एकच, लता मंगेशकर अजूनही मनामनांत, कानाकानांत आणि प्रत्येकाच्या रोमारोमांत जिवंत आहेत. रविवारी सायंकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी जी चिता पेटली, त्यात

भस्मसात झाले ते

केवळ एक अबोल, निश्चेष्ट पार्थिव. लता मंगेशकर इथेच आहेत आणि राहतील. ज्या लतादीदींनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर कित्येक दशके अधिराज्य गाजवले, त्या सुरांच्या सम्राज्ञीचे हे अढळ सिंहासन कुणालाही हिरावून घेता येणार नाही. साक्षात परमेश्वरालाही नाही. गायकीच्या क्षेत्रातील अनेक घराणी प्रसिद्ध असली, तरी लता मंगेशकर हे खऱया अर्थाने गायकीच्या प्रांतातील पवित्र संस्थान होते. हे संस्थान कुणालाही खालसा करता येणार नाही. लतादीदींनी आपल्या मंजूळ स्वरांनी तीन पिढय़ांचेच कान तृप्त केले असे नाही तर त्यांचा मधाळ आवाज, त्यांची सदाबहार गाणी पिढय़ान्पिढय़ा रसिकांच्या ओठांवर आणि कानांतही रुंजी घालत राहतील. मग त्या लता मंगेशकर गेल्या असे कसे म्हणता येईल? स्वरांची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या लतादीदींचे साधे बोलणेही जणू सुरेल गाणेच असल्याचा भास व्हायचा. पडद्यावरील असंख्य नायिकांना आपला आवाज देणाऱया लतादीदींचा सूर आज खऱया अर्थाने ‘स्वर्गीय’ झाला आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून आणि गायनकलेच्या जन्मापासून आजतागायत लता मंगेशकर या नावाला जेवढी अमाप लोकप्रियता मिळाली, ती अन्य कुणाच्या नशिबी आली काय? लता मंगेशकरांचा आवाज ऐकला नाही, असा एक तरी माणूस अख्ख्या दुनियेत शोधून सापडेल काय? साऱया विश्वाला आणि स्वर्गलोकांतील देवादिकांनाही हेवा वाटावा, असे लता मंगेशकर नावाचे अलौकिक रत्न आपल्या भूमीत आणि देशात जन्माला आले, हे महाराष्ट्राचे आणि हिंदुस्थानचे थोर भाग्यच. ‘लता मंगेशकर’ यांच्या नावातील सात शब्दांमध्येच जणू गाण्यातील सप्तसूर दडले होते. त्या सप्तसुरांची ही स्वामिनी देवलोकीच्या पहिल्या मैफिलीसाठी स्वर्गस्थ झाली आहे. वसंत पंचमीला पृथ्वीतलावर अवतरलेली साक्षात सरस्वती कन्येसह अंतर्धान पावली आहे.