सामना अग्रलेख – मतदारांनो, बाहेर पडा! स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी मतदान करा!

मोदी व शहांचे वर्तन पाहिल्यावर ते दोघे गांधींच्या भूमीतून आले यावर विश्वास ठेवता येत नाही, पण महाराष्ट्र मात्र शिवरायांच्याच विचाराने निर्भीड व सचोटीने वागला. महाराष्ट्र हे नेमके काय रसायन आहे हे मोदी-शहा-फडणवीस यांना 4 जूनला कळेल. ‘‘महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’’ असे फडणवीस अनेकदा बरळले आहेत. आता राज्यातून कोण कोणाला ‘चालते’, ‘फेकते’ ते दिसेलच. महाराष्ट्राची सुपारी मोदी-शहा-फडणवीस यांना फोडता येणार नाही असे बाणेदार व स्वाभिमानी पद्धतीचे मतदान मऱ्हाठी जनता करेल. महाराष्ट्राने मशाल पेटवली आहे. विजयाची तुतारी फुंकलीच आहे. मतदारांनो, बाहेर पडा!

आज लोकशाहीच्या महासंग्रामात निदान महाराष्ट्रात तरी अखेरच्या समिधा पडत आहेत. 13 जागांसाठी मतदान सुरू होईल. शेवटची फेरी होऊन 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल येऊ लागतील. हे झाले महाराष्ट्राचे. देशात निवडणुकांच्या अद्यापि दोन फेऱ्या व्हायच्या आहेत. निवडणुकांचा निकाल भविष्यकाळाच्या उदरात आहे, पण आपण तो आधीच पाहिला आहे अशा थाटात भारतीय जनता पक्षाचे व त्यांच्या मिंधे गटाचे लोक आपल्या निर्णायक विजयाची ग्वाही देत आहेत. भाजपचे लोक फाजील आत्मविश्वासाच्या लाटेवर स्वार झालेत व मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेण्यास निघाले आहेत अशाच थाटात वागत आहेत. भाजपला देशात चारशेपार व महाराष्ट्रात 40 पार जागा मिळणार असे जे सांगत आहेत, तो त्यांच्या प्रचाराचा एक भाग आहेच; पण सत्य असे की, या लोकांना विजयाची खात्री नाही. ते मनाने हरले आहेत. त्यामुळे भेदरल्यासारखे वागत आहेत. (जनमताचे वारे असे सांगतात की, इंडिया आघाडीस देशात 325 व महाराष्ट्रात 45 जागांवर विजय मिळत आहे.) आपल्याला बहुमत मिळालेच नाही तर कोणाची मदत घेऊन राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करता येईल, यावर त्यांची अंतर्गत खलबते सुरू झाली आहेत. ज्यांना चारशे जागा स्वबळावर जिंकण्याची खात्री आहे त्यांना देशभरातील सर्व भ्रष्ट व बलात्कारी मंडळींना आपल्या पक्षात घेऊन, त्यांच्या मदतीने निवडणूक लढवण्याची वेळच आली नसती. मोदी व शहांच्या छातीवर भीतीचे दडपण आहे व हे भय त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे. देशात मोदी व महाराष्ट्रात फडणवीस यांचा संपूर्ण कारभार अनैतिक होता. महाराष्ट्रात चोर, लुच्चे, लफंगे, लोफर अशा उमेदवारांच्या प्रचारात मोदी हे दंग झाले. शिवतीर्थावरच्या

शेवटच्या सभेत

त्यांच्यावर ज्या उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ आली ते सर्व उमेदवार भ्रष्टाचार व व्यभिचाराने बरबटले आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच या उमेदवारांच्या भ्रष्टाचाराची कुंडली विधानसभेत अनेकदा काढली. भाजपच्या विचाराची व प्रचाराची पातळी या काळात किती घसरली हे शिवतीर्थावर दिसले. या असल्या चोर, लुच्च्यांना मुंबई, ठाणेकरांनी मतदान करावे असे आवाहन करणे ही मोदी-फडणवीसांची मजबुरी असली तरी महाराष्ट्राची अशी मजबुरी अजिबात नाही. राज ठाकरे हे सुपारीबाज पुढारी आहेत, हा आरोप स्वतः श्रीमान फडणवीस यांनीच अनेकदा केला. तीच सुपारी चघळत चघळत फडणवीस व मोदी यांनी महाराष्ट्र लुटण्याची नवी योजना आखलेली दिसते. फडणवीस हे सत्य व नैतिकता यापासून दूर गेलेले नेते आहेत. ज्यांचे गुरू मोदी-शहांसारखे लोक आहेत, त्यांच्याकडून सत्य, न्याय व नीतीची काय अपेक्षा करावी? शिवतीर्थावर मोदी हे चोर, लफंगे, लुच्चे यांच्या प्रचारात दंग असताना मुंबईत अनेक भागांत भाजप व मिंध्यांकडून मतदारांना पैसे वाटण्याचा उपक्रम सुरू होता. पोलीस व निवडणूक आयोगाच्या डोळ्यांसमोर हे चालले होते. ईशान्य मुंबईतील शिवसैनिक पैसे वाटप केंद्रावर पोहोचले व जाब विचारला तेव्हा पोलिसांनी चोरांना वाचविण्यासाठी महिला, पुरुष शिवसैनिकांवरच निर्घृण हल्ला केला व खोटे गुन्हे टाकून अटका केल्या. या गोंधळात मोठी रक्कम तेथून पसार केली. आश्चर्य असे की, या चोरीच्या मालास व बेकायदा कामास संरक्षण व प्रतिष्ठा देण्यासाठी स्वतः गृहमंत्री फडणवीस हे भाजप उमेदवाराच्या कार्यालयात येऊन दमदाटी करू लागले. अलीकडे जेथे

बेकायदा व चोरीचे

काम, तेथे फडणवीस हे घडतच असते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच ही झुंडशाही उसळली असून त्या झुंडशाहीविरुद्ध मोठा लढा उभारला गेला आहे. लोकसभेची निवडणूक ही मोदी-शहांच्या हुकूमशाहीविरुद्ध सुरू आहे. मोदी काळात लोकशाही व राज्यघटनेची प्रतिष्ठा नष्ट झाली व आता त्यांना सत्ता मिळाली तर संपूर्ण संविधान ते नष्ट करतील. मोदी यांना जिंकण्याची अजिबात आशा नाही. त्यामुळे देशात हिंदू-मुसलमानांत काडी लावून अराजकाचे आगडोंब उसळवण्याची त्यांची योजना होती. त्यांनी या काळात लोकांना भडकविण्याच्या नाना तऱ्हा केल्या. काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा हा कधी मुस्लिम लीगवादी तर कधी माओवादी असल्याचे सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर घाणेरडी टीका केली. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘नकली संतान’ असा करेपर्यंत मोदी यांनी स्वतःला खालच्या पातळीवर नेले. तरीही मोदी यांना निवडणूक ताब्यात घेता आली नाही. द्वेष आणि संशयाचे वातावरण निर्माण करून मोदी व त्यांच्या लोकांनी दोन निवडणुका जिंकल्या. त्यांचा हा खेळ तिसऱ्या निवडणुकीत अजिबात चालणार नाही. याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच. मोदी व शहांचे वर्तन पाहिल्यावर ते दोघे गांधींच्या भूमीतून आले यावर विश्वास ठेवता येत नाही, पण महाराष्ट्र मात्र शिवरायांच्याच विचाराने निर्भीड व सचोटीने वागला. महाराष्ट्र हे नेमके काय रसायन आहे हे मोदी-शहा-फडणवीस यांना 4 जूनला कळेल. ‘‘महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’’ असे फडणवीस अनेकदा बरळले आहेत. आता राज्यातून कोण कोणाला ‘चालते’, ‘फेकते’ ते दिसेलच. महाराष्ट्राची सुपारी मोदी-शहा-फडणवीस यांना पह्डता येणार नाही असे बाणेदार व स्वाभिमानी पद्धतीचे मतदान मऱ्हाठी जनता करेल. महाराष्ट्राने मशाल पेटवली आहे. विजयाची तुतारी फुंकलीच आहे. मतदारांनो, बाहेर पडा!