सामना अग्रलेख – महाराष्ट्राची मशाल!!

महाराष्ट्राचे मोठेपण आणि स्वाभिमानाचे जिणे दिल्लीच्या व्यापार मंडळास मान्य नाही. औरंगजेबाची चारशे वर्षांपूर्वी हीच वृत्ती होती. त्या औरंगजेबाची कबर शेवटी महाराष्ट्रातच बांधली गेली. 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून पेटलेली स्वाभिमानाची मशाल सतत पेटत ठेवणाऱ्या महाराष्ट्राने कधी कच खाल्ली नाही. आज बेइमानांच्या हाती महाराष्ट्राच्या चाव्या आहेत. त्या चाव्यांचे मालक दिल्लीत बसून महाराष्ट्र संपविण्याचे औरंगजेबी स्वप्न पाहत आहेत. या संकटातूनही महाराष्ट्र मोठी झेप घेईल व पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त फोडून लाल किल्ल्यावर ‘मशाल’ पेटवून देश प्रकाशमान करेल. आजच्या महाराष्ट्र दिनी हेच शुभसंकेत व शुभेच्छा!

दिल्लीच्या अलीकडच्या स्वाऱ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्मावर रोज हल्ले करीत असताना महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा होत आहे. परिस्थिती अशीच आहे की, महाराष्ट्र अलीकडे वारंवार दिल्लीच्या चरणी लोटांगण घालत आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्माची प्रकर्षाने आठवण येते. शिवाजी महाराज मोगल दरबारात गेले आणि चौथ्या-पाचव्या श्रेणीच्या सरदारांच्या रांगेत त्यांना उभे करण्यात येताच मस्तकी तिडीक जाऊन तेथून ते ताडकन उठून गेले आणि पुढे त्यांनी दिल्लीशी वैर पत्करले. हाच तो स्वाभिमानी महाराष्ट्र धर्म! याच महाराष्ट्र धर्मासाठी 107 हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र त्या त्यागाची महाराष्ट्राचे सध्याचे राज्यकर्ते अवहेलना करीत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस आता 64 वर्षे झाली. म्हणजे महाराष्ट्र राज्य हे ज्येष्ठ आणि परिपक्व होत आहे, पण राज्य म्हणून विचार करताना आज हे महाराष्ट्र राज्य बलवान राहिले आहे काय? याचे उत्तर नकारात्मक आहे. महाराष्ट्राचा शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, शिक्षक, महिला, कामगार वर्गात कमालीचे नैराश्य आहे. आपल्याच महाराष्ट्रात त्यांना गुदमरल्यासारखे वाटत आहे. महाराष्ट्राचे स्वातंत्र्य, स्वाभिमान, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार कुठेतरी अडगळीत पडल्याच्या भावनेतून मराठी समाजमन अस्वस्थ झाले आहे. शौर्य, धैर्याची परंपरा असलेला महाराष्ट्र दिल्लीतील गुजराती व्यापार मंडळाच्या पकडीत कासावीस झाला आहे व मऱ्हाठ्यांचा इतिहास जणू ‘वाचवा वाचवा’ अशा जीवघेण्या आरोळ्या ठोकीत सुटकेची याचना करीत आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या वेळी अभ्युत्थानासाठी परमेश्वर अवतार घेतो, असे भगवान कृष्णाने सांगितले आहे. धर्माला ग्लानी येते याचा अर्थ ‘धर्म लोपतो’ असा नव्हे, तर त्याचे तेज व प्रभाव नाहीसा होतो आणि

पाखंडाचे प्रस्थ

माजते. ही ग्लानी दूर करून महाराष्ट्र धर्म प्रभावी व फलदायी करण्याचे काम आपल्या सगळ्यांना करावे लागणार आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्र भाजपनामक विकृतीने पछाडलेला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात मागे मागे पडत आहे. एकेकाळी महाराष्ट्र उद्योगधंद्यात अग्रेसर होता. ‘औद्योगिक प्रगत राज्य’ अशी आपली ख्याती होती. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात जागोजागी औद्योगिक वसाहतींची उभारणी केली. पुढच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उद्योग साम्राज्यात भर घातली. जगभरातून नवे उद्योग व गुंतवणूक राज्यात आली. उद्योग-व्यापारासाठी पूरक असे वातावरण निर्माण केले. त्यातून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून भरभराटीस आली. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आणि महाराष्ट्र देशाचा पोशिंदा बनला. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी या मुंबईत जणू भारतच वसला व वाढला. आज ‘मोदी युगात’ महाराष्ट्राचा उद्योग-व्यवसाय बंद पाडून तो गुजरातला पळवला जात आहे. एक प्रकारे मुंबईचे महत्त्वच कमी करण्याचे हे कारस्थान आहे. महाराष्ट्रावरील हा आर्थिक दहशतवादाचा हल्ला भयंकर आहे. मोदी-शहा यांनी वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन दिले, पण देशाला सर्वाधिक रोजगार व नोकऱ्या देणाऱ्या महाराष्ट्राला दुर्बळ, अस्थिर केले. त्यामुळे नोकऱ्यांची निर्मितीच थांबली. महाराष्ट्रात शिवसेना पह्डून लढाऊ बाण्याच्या महाराष्ट्राला अपंग करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तुकडा पाडला.

महाराष्ट्र धर्म

व स्वाभिमानासाठी लढणाऱ्या ठाकरे-पवारांवर हल्ले करून महाराष्ट्र धर्मास ग्लानी आणण्याचे पाप मोदी-शहांनी केले. अर्थात महाराष्ट्रावर असे कितीही प्रहार केले तरी शिवरायांच्या या भूमीतील महाराष्ट्र अधिकाधिक बलदंड होऊन लढायला उभा ठाकतो, हा इतिहास आहे. सध्या महाराष्ट्र धर्मास आलेली ही ग्लानी तात्पुरती आहे. ही ग्लानी दूर करण्याकरिताच जणू शिवसेना हाती मशाल घेऊन नव्या शक्ती व तेजात अवतरली आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्रातील विद्यमान राज्यकर्ते महाराष्ट्राची पीछेहाट करीत असले तरी शिवसेनेच्या मशालीच्या तेजाने महाराष्ट्राचा उद्धार व कायापालट होऊन महाराष्ट्र धर्माचे पालन महाराष्ट्रात होईल याविषयी आम्हाला शंका नाही. महाराष्ट्राने प्रत्येक संकट हे संधी म्हणूनच झेलले. देशाच्या लढ्यात महाराष्ट्र पुढेच राहिला. हिमालय जेव्हा जेव्हा संकटात आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री मदतीस धावला. त्या महाराष्ट्राच्या पाठीत वार करण्यासाठी दिल्लीने आता जंग छेडले आहे. महाराष्ट्राचे मोठेपण आणि स्वाभिमानाचे जिणे दिल्लीच्या व्यापार मंडळास मान्य नाही. औरंगजेबाची चारशे वर्षांपूर्वी हीच वृत्ती होती. त्या औरंगजेबाची कबर शेवटी महाराष्ट्रातच बांधली गेली. 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून पेटलेली स्वाभिमानाची मशाल सतत पेटत ठेवणाऱ्या महाराष्ट्राने कधी कच खाल्ली नाही. आज बेइमानांच्या हाती महाराष्ट्राच्या चाव्या आहेत. त्या चाव्यांचे मालक दिल्लीत बसून महाराष्ट्र संपविण्याचे औरंगजेबी स्वप्न पाहत आहेत. या संकटातूनही महाराष्ट्र मोठी झेप घेईल व पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त पह्डून लाल किल्ल्यावर ‘मशाल’ पेटवून देश प्रकाशमान करेल. आजच्या महाराष्ट्र दिनी हेच शुभसंकेत व शुभेच्छा!