सामना अग्रलेख – बिहारातील उलथापालथ; नितीश कुमार, आगे बढो!

नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली. त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही. तेजस्वी यादवही बेधडक आहेत. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे! समझने वालों को इशारा काफी है!

बिहारात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली आहे. बिहारातदेखील महाराष्ट्राप्रमाणेच ‘शिंदे’ गट वेगळा करून भाजपचे दिल्लीश्वर नितीश कुमार यांना मात देण्याचे कारस्थान करीत होते. त्यासाठी नितीश कुमार यांचे ‘शिंदे’ आर.सी.पी. सिंग यांना हाताशी धरून पोखरापोखरीचे काम सुरूच केले होते, पण नितीश कुमार यांनी भाजपलाच धोबीपछाड देणारी पलटी मारली आहे. बिहारात भाजपबरोबरची युती तोडल्याचे ‘जेडीयू’ने मंगळवारी जाहीर केले. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मंगळवारी राजीनामा सोपवला. बुधवारी नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाची तर ‘राजद’चे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नव्या ‘महागठबंधन’ सरकारमध्ये जदयू, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससह इतर घटक पक्षांचा सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष विश्वासघातकी असल्याचे मत ‘जेडीयू’ने व्यक्त केले. भाजप नितीश कुमार यांच्या पक्षालाच सुरुंग लावायला निघाला, पण तो खेळ भाजपवर उलटला आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा लांबलेला पाळणा थोडा हलू लागला असतानाच बिहारात त्यांच्या सत्तेच्या पाळण्याची दोरीच तुटली. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू युती होती, पण निवडणुकीत नितीश कुमारांचे उमेदवार पाडण्याचा उद्योग भाजपने केला. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांच्या ‘जेडीयू’ला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या व भाजपने मेहरबानी खात्यात नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिले असे चित्र निर्माण केले. केंद्रीय मंत्रिमंडळात ‘जेडीयू’चे राज्यसभा सदस्य आर.सी.पी. सिंग यांचा समावेश नितीश कुमार यांच्या मनाविरुद्ध होता, पण सिंग यांना बळ देऊन भाजपास बिहारात नितीश कुमारांना अस्थिर करायचे होते. हे लक्षात येताच नितीश कुमार यांनी दिल्लीशी संपर्कच तोडला. दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे दाखवले व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या किमान पाच बैठकांना गैरहजर राहिले. महाराष्ट्रातील सध्याच्या गुडघेटेकू मुख्यमंत्र्यांनी हा ‘बाणा’ समजून घेतला पाहिजे. जेडीयू व तेजस्वी यादवांच्या काही आमदारांवर

‘ईडी’ वगैरेंचा फास

आवळला तरीही भाजपच्या गळास कोणी लागले नाही. बिहारी अस्मितेच्या रक्षणासाठी लढू, पण शरण जाणार नाही, अशी भूमिका येथील भाजप वगळता इतर विधानसभा सदस्यांनी घेतली व शेवटी मंगळवारी नितीश कुमारांनी उंटाच्या पाठीवर शेवटची काडी ठेवली. बिहारमध्ये घडणाऱ्या राजकीय क्रांतीचे पडसाद संपूर्ण देशात उमटतात. महाराष्ट्रातले शिवसेना आघाडीचे सरकार पाडले या आनंदात खुशीची गाजरे खात असतानाच बिहारात भाजपविरोधात बंडाची ठिणगी पडली आहे. बाजूला प. बंगाल आहेच. महाराष्ट्रही अशांत टापू बनला आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे गणित मांडून नितीश कुमार यांनी हे धाडसी पाऊल उचलले असेल तर देशातील समस्त विरोधी पक्षाने नितीश कुमारांचे स्वागत केले पाहिजे. ‘ईडी’चा धाक, कपट-कारस्थानाने महाराष्ट्राचे सरकार पाडले, पण बिहारात नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेतून दूर फेकले, हे सत्य आहे. 2024 साली पुन्हा आम्ही आणि आम्हीच हा भाजपचा अहंकार आहे. ‘देशात 2024 साली फक्त भाजपच राहील, दुसरे कोणी शिल्लक राहणार नाही,’ अशी वल्गना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा करीत होते व तिकडे बिहारसारखे राज्य भाजप गमावत होता. जयप्रकाश नारायण यांच्या भूमीतून ही विद्रोहाची मशाल पेटली आहे. नितीश कुमार हे जयप्रकाश यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात होते. लालू यादवही होते, पण यादव आणि नितीश कुमारांत सतत संघर्ष राहिला, तो आता तरी थांबायला हवा. लालू यादव यांची प्रकृती पुरती ढासळली आहे. ते क्षीण झाले आहेत. त्यांच्याकडून आता फारसे फिरणे व बोलणे होत नाही. भाजपनेच त्यांची ही दशा केली, पण यादवांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे बिहारातील तरुण नेते लोकप्रिय झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व जदयु युतीपुढे त्यांनी आव्हान उभे केले होते. त्या वेळी ते बहुमताच्या जवळ आलेच होते, पण दहा-बारा जागांवर शेवटच्या फेरीत

गडबड-घोटाळा करून

भाजपने बाजी मारली, पण तेजस्वी यादव यांनी मैदान सोडले नाही. आता नितीश कुमार यांच्या बरोबरीने ते सरकार बनवत आहेत. ही आघाडी 2024 मध्ये अशीच भक्कम राहिली तर लोकसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतात, हे सत्य आहे. महाराष्ट्रातील ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेप्रमाणेच श्री. नड्डा यांची ‘आम्हीच येऊ, फक्त आम्हीच’ ही घोषणा आहे. लोकशाहीत मतपेटीच्या मार्गाने कोणीही येऊ शकेल, पण आम्हीच येऊ असे सांगणारे लोकशाही मानतात काय? बिहारमधील भाजपचे नेते सुशील मोदी आता बरळले आहेत की, ‘शिवसेना आम्ही फोडली. जे आमच्याबरोबर राहणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील. शिवसेनेला ते भोगावे लागले.’ याचा काय अर्थ घ्यायचा? शिंदे गट सांगतोय त्यावर गुळण्या टाकण्याचाच हा प्रकार. आम्ही हिंदुत्व किंवा स्वाभिमानासाठी बाहेर पडलो हा दावाच सुशील मोदी यांनी खोडून काढला. शिंदे गट शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी फोडला हे त्यांनी जाहीर केल्यावर सगळय़ांचेच वस्त्रहरण झाले! पण आता त्यांच्याच बिहारमध्ये नितीश कुमार भाजपपासून दूर झाले. त्यावर काय बोलणार आहात? शिवसेनेप्रमाणे नितीश कुमारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला तेव्हा कुमारांनी उलटा तुम्हालाच डंख मारला हेच सत्य आहे. नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली. त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही. तेजस्वी यादवही बेधडक आहेत. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आले नाही. प्रत्येकाला सिंहासनावरून कधी तरी उतरायचे आहे. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे! समझने वालों को इशारा काफी है!