
पंतप्रधान मोदी यांचे पाय जागतिक दबावाच्या भयाने लटपटत आहेत. भारतात ते विरोधी पक्ष व जनतेवर ‘धाक’ दाखवत असले तरी हा वरवरचा देखावा आहे. मोदी व त्यांचे लोक शूर या श्रेणीत कधीच बसत नव्हते. शौर्याचा मुखवटा लावूनच ते राज्य करीत होते. गैरमार्गाने निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांनी कमावला. त्यातून जनतेला कायम भीतीच्या सावटाखाली ठेवले. भीतीच्या खांबावर उभा असलेला भाजपच्या सत्तेचा डोलारा आता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. ‘महागाई’वरील गीतावर घातलेली बंदी ही सुरुवात आहे. डरपोक लेकाचे!
देशात महागाईचा कडेलोट झाला आहे, पण महागाईने कहर केलाय, महागाईने जगणे कठीण झालेय असे बोलणे, महागाईवर मत मांडणे हा सरकारने गुन्हा ठरवला आहे. महागाईमुळे लोकांच्या भावना भडकतील व लोक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरतील असे भय केंद्र सरकारला वाटते. हे डरपोकपणाचे लक्षण आहे. मागच्या आठ दिवसांत चार वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या. पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा फटका जीवनावश्यक अशा सर्व गोष्टींना बसतो. सरकार इतके घाबरले आहे की, त्यांनी ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटातील महागाई डायन खाऊन जाते या गाण्यावर बंदी घातली आहे. म्हणजे तेच, महागाईच्या आगीत जळून मरा, पण तोंडातून वेदनेचा शब्द काढायचा नाही. हे सरकार महाडरपोकच म्हणायला हवे. हे सरकार स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारांना घाबरले, हे सरकार टीकाकारांना घाबरले, हे सरकार व्यंगचित्रकारांना घाबरले. सरकार मिमिक्री आणि स्टॅण्ड-अप कॉमेडियनना घाबरले व त्यांना सरकारने तुरुंगात पाठवले. सरकार राजकीय विरोधकांना घाबरते व त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावते. हे सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना घाबरते व त्या राज्यांतील निवडणुकांवरच दरोडा टाकते. सरकारने ‘ऑनलाईन’ कॉक्रोच जनता पार्टीला धमक्या दिल्या व आता सरकारने महागाईवर बनलेल्या गाण्यावर बंदी घालून आपण एक भयभीत हुकूमशहा असल्याचे दाखवून दिले. हुकूमशहा हा डरपोकच असतो. चार लोक एकत्र चर्चा करीत असले तरी हुकूमशहा घाबरतो. त्याला वाटते आपल्याविरुद्ध कट रचला जात आहे. खरे तर ज्या ‘महागाई’च्या गाण्यावर मोदी-भाजपने बंदी घातली आहे, त्याच गाण्यामुळे हे ‘डरपोक’ सत्तेवर आले होते. सुषमा स्वराज, स्मृती इराणी यांच्यासह समस्त भाजपचे नेते महाग झालेला कांदा, दूध, सिलिंडर वगैरे प्रश्नांवर रस्त्यावर उतरले होते. त्यांनी संसद दणाणून सोडली होती. काँग्रेसने कधी महागाईविरुद्ध आंदोलनावर व महागाईवरील अशा गाण्यांवर बंदी घालून
लोकशाहीची मुस्कटदाबी
केल्याची नोंद नाही, पण आताचे सरकार हे लोकभावनेच्या विरोधी असल्याने ते घाबरून गेले आहे. सरकार एका व्यंगात्मक गीताला इतके भयभीत होत असेल तर हे आपल्या लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. व्यंग, टीका, असहमतीला घाबरणारे सरकार मानसिकदृष्ट्या स्थिर नसतेच, पण ते सदैव लटपटलेल्या अवस्थेत वावरताना दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास हा खोटा असतो. हिटलर हा स्वतःला एक शक्तिमान नेता मानत असे, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डेव्हिड लोच्या धारदार व्यंगचित्रांनी त्याची झोप उडवली होती. व्यंगचित्रकार लो यास जिवंत किंवा मुर्दा आपल्यासमोर हजर करा, असे फर्मान त्याने सोडले होते. हे हुकूमशहाच्या डरपोकपणाचे लक्षण आहे. हिटलरसारखे लोक वरून स्वतःला मजबूत असल्याचे दर्शवतात, पण प्रत्यक्षात ते डरपोक असतात. मुख्य म्हणजे ज्या देशावर ते जबरदस्तीने राज्य करतात, त्याच देशातील जनतेला ते भीत असतात. त्यामुळे लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, निवडणूक यंत्रणा, न्यायालयासारख्या संस्थांवर ते ताबा मिळवतात. भारतात सध्या हे असेच सुरू आहे. ‘पीपल लाईव्ह’ हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग होते. या चित्रपटातील रघुवीर यादव यांच्या आवाजात गायलेले गीत ‘सखी सईंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है…’ या ओळीने सामान्य माणसाच्या जीवनातील कटू सत्यच सांगितले आहे. पती कष्ट करतो, पोटापुरते कमवायचा प्रयत्न करतो, पण महागाई सगळे खाऊन टाकते. जेव्हा जेव्हा महागाईचा राक्षस धुमाकूळ घालतो, तेव्हा तेव्हा या गीताची आठवण येते. आताही महागाईने सामान्य माणसाचे जिणे हराम झाले असल्याने देशातील लोकांना या गाण्याची आठवण आली तर त्यात त्यांचे काय चुकले? परंतु या गाण्याची आठवणही काढायची नाही, असेच केंद्र सरकारचे धोरण आहे. अभिनेता आमीर खान प्रॉडक्शन्सच्या हॅण्डलवर पोस्ट झालेले हे गाणे काहीच वेळात डिलीट केले गेले. त्यामागेही सरकारचाच दबाव आहे, दडपशाही आहे, हे उघड आहे. वास्तविक, हे केवळ एका चित्रपटाचे गीत नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासूनच्या जनतेच्या
असंतोषाचे प्रतीक
आहे. भाजपला हे गीत एकेकाळी प्रिय होते, पण आता त्यांच्या सरकारला हे गीत व त्यातील संतप्त भावना नकोशा झाल्या आहेत. महागाईविरोधात जनतेचा असंतोष असेल तर सरकारने तो असंतोष दाबू नये. समाजमाध्यमांवरून हे गीत हटवल्याने महागाई संपणार नाही. उलट जनतेच्या मनातला उद्रेक खदखदून बाहेर पडेल. देशात प्रचंड असंतोष आहे व त्या असंतोषाचा भडका उडून मोदी सरकार येत्या वर्षभरातच जाणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. हे सत्यच आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत केलेली सर्व भाकिते आणि दावे खरे ठरले आहेत. हे सत्य स्वीकारले तर मोदी यांच्या जुलमी सत्तेचे वर्षभरात पतन हे ठरलेलेच आहे. यावर प्रत्यक्ष सरकारचाच विश्वास बसला आहे व त्यासाठीच त्यांनी महागाईविरोधी असंतोष दडपण्यास सुरुवात केली आहे. मोदी हे विदेशी शक्तींचे कळसूत्री बाहुले बनले आहेत. अमेरिकेचे विदेश मंत्री काल-परवा भारतात आले व त्यांनी परस्पर घोषणा केली की, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येतील व इंधन खरेदीसंदर्भात भारताशी करार करतील. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती भारतात येणार हे भारताला माहीत नाही व प्रत्यक्ष व्हेनेझुएलाच्या सरकारला माहीत नाही, पण तशी घोषणा तिसऱ्याच देशाने केली. यावरून भारतीय पंतप्रधानांचा कसा खुळखुळा झाला आहे ते स्पष्ट दिसते. पंतप्रधान मोदी यांचे पाय जागतिक दबावाच्या भयाने लटपटत आहेत. भारतात ते विरोधी पक्ष व जनतेवर ‘धाक’ दाखवत असले तरी हा वरवरचा देखावा आहे. मोदी व त्यांचे लोक शूर या श्रेणीत कधीच बसत नव्हते. शौर्याचा मुखवटा लावूनच ते राज्य करीत होते. गैरमार्गाने निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांनी कमावला. त्यातून जनतेला कायम भीतीच्या सावटाखाली ठेवले. भीतीच्या खांबावर उभा असलेला भाजपच्या सत्तेचा डोलारा आता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. ‘महागाई’वरील गीतावर घातलेली बंदी ही सुरुवात आहे. डरपोक लेकाचे!






























































