सामना अग्रलेख – ते जाणार हे नक्की! पाटावर कोण बसणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भर मंडपात ‘वरमाला’, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडविले गेले, त्या धक्क्यातून ते अद्यापि सावरलेले दिसत नाहीत. त्यात आता मुख्यमंत्रीपदासाठी कधी विखे–पाटलांचे नाव तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते आहे.  मिंधे गट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यात दंग आहे, तर फडणवीस गट वरून गोडबोलेपणाचा आव आणत पाठीमागून वेगळाच ताव मारीत आहे. ते काही असो. सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्की. फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात ते पाहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ व अराजक कधीच माजले नव्हते!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भलताच खेळखंडोबा सुरू आहे. राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही, पण राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत की नाही? असा प्रश्न पडला आहे. पण मुख्यमंत्रीपदावर रोज चर्चा झडत आहेत. मुख्यमंत्रीपद रिकामे नाही हे खरे, पण रिकामपणाचे उद्योग जोर धरू लागले आहेत. एका कार्यक्रमात अजित पवार यांना प्रश्न विचारला तो मुख्यमंत्रीपदाविषयी. श्री. पवार म्हणाले, ‘‘2024 पर्यंत का थांबता? आताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल!’’ मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे सांगणे यात गैर ते काय? यावर महाराष्ट्राच्या राजकीय शेअर बाजाराच्या चढ-उताराने कळस गाठला. झाले झाले, गेले गेले, आले आले असा कल्लोळ सुरू झाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कधीपासून मुख्यमंत्री व्हायचे आहे. विखे यांना पवारांच्या वक्तव्यांविषयी विचारले, त्यांनी थेट वेगळाच सूर पकडला, ‘‘आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच!’’ असे सांगून शिंदे-मिंधे गटाचे कपडेच उतरवले. म्हणजे सध्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण मोजत नसल्याचेच त्यांनी स्पष्टपणे सांगितले. श्री. फडणवीस तर विखे पाटलांच्या पुढे शंभर पाऊल गेले व हळूच म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रीपदाचे काय? कोणीही इच्छा बाळगू शकतो, पण योग्यता हवी ना?’’ फडणवीसांनी हे विधान हसत हसत केले असले तरी त्यामागे वैफल्य आणि त्रागा आहे. हा त्रागा सवती मत्सराचा आहे. भर मंडपात ‘वरमाला’, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडविले गेले, त्या धक्क्यातून ते अद्यापि सावरलेले दिसत नाहीत. त्यात आता

मुख्यमंत्रीपदासाठी

कधी विखे-पाटलांचे नाव तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते आहे. या दुःखाने बेजार झालेले फडणवीस ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशा परमोच्च अवस्थेला पोहोचले आहेत. ही अवस्था म्हणजे बेधुंद नशेचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता खेळखंडोबा गेल्या आठेक महिन्यांत झाला व त्यात राज्य लयास गेले आहे. राज्य कसे चालले आहे? तेसुद्धा गमतीचेच आहे. पंतप्रधान मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणारे एक पत्र कुण्या अज्ञाताकडून लिहिण्यात आले. तेसुद्धा भाजपचे राज्य नसलेल्या केरळातून. त्या पत्रामुळे इतकी खळबळ माजवली गेली की, संपूर्ण केरळ देशातील सुरक्षा यंत्रणांनी पिंजून काढले व शेवटी मन भरकटलेल्या ‘जॉन’ नामक पत्रलेखकास अटक केली. अशा तऱ्हेने एक मिशन फत्ते झाले, पण खारघरमध्ये श्री. फडणवीस यांच्या डोळय़ांसमोर 16 जणांचा भुकेने तडफडून मृत्यू झाला, लोक चेंगरून मेले या सरकार पुरस्कृत हत्येवर फडणवीस बोलायला तयार नाहीत. सत्तेची ही कोणती देशी नशा त्यांना चढली आहे? कुनो राष्ट्रीय उद्यानातील एका आफ्रिकन चित्त्याचा मृत्यू होताच पंतप्रधानांना दुःख होते. पंतप्रधानांना दुःख झाले म्हणून समस्त भाजपला दुःख झाले, पण 16 श्री सेवकांच्या मृत्यूवर, सदोष मनुष्यवधावर यापैकी कोणी बोलायला तयार नाही. पंतप्रधानपदावरील व्यक्तीस हल्ल्याची धमकी देणे गंभीर आहे, पण अशा धमक्या महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांना रोज आणि रोजच मिळत आहेत. तिकडे कोकणातील रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शेकडो

आंदोलकांच्या छाताडावर

फडणवीसांचे पोलीस बंदुका रोखून उभे आहेत. रिफायनरीविरोधातील आंदोलन चिरडायचे, मग त्यात आंदोलकांचे बळी गेले तरी चालतील असे अमानुष धोरण मिंधे-फडणवीस सरकारचे आहे. सत्तेची नवटाक दारू चढल्यानेच हे निर्घृण कृत्य सुरू आहे. पैशांच्या व सत्तेच्या नशेत राज्य सरकार चूर असून महाराष्ट्र राज्य त्या नशेत झोकांडय़ा खात आहे. मिंधे गट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यात दंग आहे, तर फडणवीस गट वरून गोडबोलेपणाचा आव आणत पाठीमागून वेगळाच ताव मारीत आहे. हा ताव काय व कसा ते विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले. शिंदे-मिंधे गटाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर नांदण्याचे नाटक करायचे व प्रेमसंबंध आणखी कुणाबरोबर ठेवायचे. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाला डोळा मारतो तो असा हे सौ. अमृतावहिनीसाहेबांनी सांगितले ते बहुधा त्यासाठीच. शेजेवर मिंध्यांच्या, पण मनात फडणवीस! हा काय संसार झाला? पण या संसारात आता कुणी तिसरा-चौथा घुसत आहे किंवा घुसवला जात आहे. यावर मिंधे गटाचे प्रवक्ते गोगावले सांगतात, ‘‘आमच्या मनात मिंधेच. तशी दिल्लीची कमिटमेंट आहे.’’ श्रीमान गोगावले असेही म्हणतात की, ‘‘अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. पवार मुख्यमंत्री होणे शक्य नाही!’’ पवारांना काय व्हायचे व काय नाही हे ठरवणारा मिंधे गट कोण? गोगावले हे काय पवारांचे वकील आहेत? ते काही असो. सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्की. फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात ते पाहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ व अराजक कधीच माजले नव्हते!