
भाजपने हिंदुत्ववादी संघटना फोडल्या. आमदार-खासदार विकत घेतले. देशातील न्यायालये, निवडणूक आयोगावर ‘हिटलर’प्रमाणे ताबा मिळवला. संघावरही आता त्याच लोकांचा ताबा आहे व श्रीमंतीची चटक त्यांनी संघाला लावली हे दिसते. संघ व भाजप वेगळा नाही. भ्रष्ट भाजपला पुनःपुन्हा सत्तेवर आणण्यासाठी संघाचे लाखो वेडे स्वयंसेवक जिवाचे रान करतात; पण इतके होऊनही संघाच्या स्वप्नातला अखंड हिंदुस्थान निर्माण होत नाही की सावरकरांना भारतरत्न दिले जात नाही. बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या थांबत नाहीत. सरसंघचालकांचे ‘लेक्चर’ मात्र सुरू आहे. धन्यवाद!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे एक चमत्कारिक विषय आहे. मोदींचे सरकार देशावर आल्यापासून चमत्काराने गती पकडली आहे. आम्ही एक एन.जी.ओ. म्हणजे स्वयंसेवी संस्था आहोत. राजकारणाशी वगैरे आमचा संबंध नाही, असा दावा करणाऱ्या या संघटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित एका संवाद कार्यक्रमानिमित्त मुंबईत सर्वच क्षेत्रांतील हजारभर लोक एकत्रित आले व त्यांना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संबोधित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल, प्रवास, स्थापनेपासून ते आजपर्यंत राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या सहभागाचा प्रवास सरसंघचालकांनी उलगडून दाखवला. हा प्रवास ऐतिहासिक, प्रेरणादायक, संघर्षमय वगैरे असल्याचे त्यांनी सांगितले. सरसंघचालक सांगतात, ‘‘संघाचे कार्य देशासाठी आहे. कोणालाही विरोध न करता संघाचे कार्य चालते.’’ अर्थात हे विधान फक्त बोलण्यापुरते आहे. डॉ. भागवत यांच्या या ‘लेक्चर’ला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात प्रख्यात अभिनेते सलमान खानसह अनेक सितारे अवतरले. संघास शंभर वर्षे झाली, पण मोदी युग येण्याआधी यापैकी कोणीच संघ कार्यक्रमास उपस्थित राहिल्याची नोंद नाही. त्यामुळे एका अनामिक भीतीपोटी हे सर्व लोक संघ शताब्दी सोहळय़ास उपस्थित राहिले काय? ‘उगाच झंझट नको’ ही भावना त्यात जास्त असावी. अभिनेता रणबीर कपूर हजर होता. राज कपूर हे त्याचे आजोबा. याआधी कोणत्याही भाजप किंवा संघाच्या व्यासपीठावर कपूर दिसले नव्हते. कारण स्वतः राज कपूर हे डाव्या विचारसरणीचे, पक्के कम्युनिस्ट होते. त्यांच्या चित्रपटांतून या विचारांची झलक नेहमी दिसली, पण हे छोटे कपूर संघ सोहळ्यास हजर होते. अनेक वैज्ञानिक, कायदेपंडित, लेखक, उद्योगपती या शताब्दी सोहळ्यास उपस्थित होते. डॉ. भागवत यांनी या महनीय व्यक्तींसमोर ‘लेक्चर’ म्हणजे संबोधन केले. त्यातील काही मुद्दे खरेच
चमत्कारिक व संभ्रमित करणारे
आहेत. म्हणजे ‘‘मोदी हे पंतप्रधान असले तरी त्यांचा पक्ष हा भाजप आहे आणि भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे वेगवेगळे आहेत. सरकारमध्ये काही स्वयंसेवक जरूर आहेत, पण त्याचा अर्थ संघ सत्तेत आहे असा अजिबात नाही.’’ डॉ. भागवत कोणाला वेड्यात काढीत आहेत? त्यांच्या समोरच्या लोकांना ते काही काळ संभ्रमित करू शकतात, पण देश मूर्ख नाही. भाजप व संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्ताधारी म्हणून भाजप करीत असलेल्या सर्व पापांत संघाचा सहभाग आहे. दिल्लीत झंडेवाला इस्टेटला संघाचे पंचतारांकित कार्यालय उभे राहिले व पार्किंगला जागा अपुरी पडते म्हणून दीडशे वर्षे पुरातन मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आले. भाजपबरोबरच्या सत्ता सहभागाच्या अहंकारातून हे घडले. संघ आता भाजपच्या भ्रष्टाचारात, गुन्हेगारीत व असंविधानिक कृत्यांत उघड सहभागी झाला. त्यामुळे आमचा भाजपशी संबंध नाही अशी फेकाफेक त्यांना करता येणार नाही. संघ वेगळा, भाजप वेगळा ही निव्वळ थाप आहे. 1970 साली जनता पक्षाचे राज्य देशात काँग्रेसच्या हुकूमशाहीविरोधात स्थापन झाले. त्यात संघाचे लोक होते, पण दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून ‘संघ’वाल्यांनी ते सरकार मोडले. मधू लिमये वगैरे लोकांनी संघाशी काडीमोड घ्या असे सुचवले तेव्हा वाजपेयी, आडवाणी वगैरे लोकांनी त्यास नकार दिला व सरकार पाडले. तरीही तेव्हाचा संघ व त्यांचे स्वयंसेवक आजच्यापेक्षा शुद्ध, पवित्र आणि प्रामाणिक होते. संघाविषयी त्यावेळी आदराची भावना होती. आज संघाचे ते चारित्र्य राहिले आहे काय? संघ म्हणजे एक स्वयंसेवी संस्था असल्याचे हे लक्षण नाही. मोदी व शहांचा पक्ष भाजप असला तरी त्यांची ‘शाळा’, ‘संघ’ व ‘महाविद्यालय’ संघ आहे. मोदींच्या डिग्रीचा घोळही त्यामुळेच झाला. कारण सगळ्यांचेच चारित्र्य साफ बिघडले आहे. ‘‘हिंदू-मुसलमान वेगळे नाहीत. जे मुस्लिम येथील प्रथा-परंपरा, रूढी आणि संस्कृती आपली मानतात ते आपलेच आहेत. त्यामुळे
त्या सर्वांना आपले
मानले पाहिजे,’’ असे शब्दसुद्धा डॉ. भागवत उद्गारतात, पण फक्त सलमान खानला आमंत्रित करून हे शक्य होणार नाही. सलमान खान हा एक ‘शो व्यापार’ आहे. सलमानच्या संघमंचावर येण्याने संघाचे दरवाजे मुसलमानांसाठी उघडे होणार आहेत काय? ‘हिंदू-मुसलमान’ असे द्वेषाचे राजकारण पंतप्रधान मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस करतात. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे एक पोस्टर झळकावले त्यात मुख्यमंत्र्यांच्या हातात बंदूक असून ते मुसलमानांवर नेम धरत असल्याचे दाखवले व संघाचे पंतप्रधान त्यावर गप्प आहेत. रिक्षावाला मुसलमान असेल तर त्याला भाडय़ाचे पैसे देऊ नका, असे आसामचे मुख्यमंत्री एखाद्या गुंडाच्या आवेशात सांगतात व कायदा नपुंसक होऊन हे सहन करतो. पुन्हा केंद्रातील सत्ताधारी त्यावर गप्प आहेत. सत्तेवर संघ विचाराचे लोक आहेत हे काय डॉ. भागवत यांना माहीत नाही? संघाला भारतीय संविधान मान्य नाही, पण मतांसाठी ते डॉ. आंबेडकर यांचा ‘उदो उदो’ करतात. समाज गुणवान होईल तेव्हाच परिवर्तन होईल, असे भागवत सांगतात. पण गुणवंतांच्या गळ्यात धोंड बांधून त्यांना समुद्रात ढकलले गेले आहे आणि देशभरातल्या भ्रष्टाचारी, व्यभिचारी, घोटाळेबाजांची ‘भाजपा’त भरती करून मोदी वगैरे लोक भाजपास वेगळ्या पद्धतीने मजबूत करीत आहेत. एकतर मातृसंस्था संघाचे आता कोणी ऐकत नाही किंवा भाजप, मोदींच्या पापकर्मास संघाची संमती आहे. एकत्र मिळून खाण्याची, देश लुटण्याची ही नवी परंपरा सुरू आहे. भाजपने हिंदुत्ववादी संघटना फोडल्या. आमदार-खासदार विकत घेतले. देशातील न्यायालये, निवडणूक आयोगावर ‘हिटलर’प्रमाणे ताबा मिळवला. संघावरही आता त्याच लोकांचा ताबा आहे व श्रीमंतीची चटक त्यांनी संघाला लावली हे दिसते. संघ व भाजप वेगळा नाही. भ्रष्ट भाजपला पुनःपुन्हा सत्तेवर आणण्यासाठी संघाचे लाखो वेडे स्वयंसेवक जिवाचे रान करतात; पण इतके होऊनही संघाच्या स्वप्नातला अखंड हिंदुस्थान निर्माण होत नाही की सावरकरांना भारतरत्न दिले जात नाही. बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या थांबत नाहीत. सरसंघचालकांचे ‘लेक्चर’ मात्र सुरू आहे. धन्यवाद!






























































