सामना अग्रलेख – वाहतूककोंडीची महासत्ता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील भयंकर वाहतूक कोंडीविषयी सणसणीत अंजन घालणारी आकडेवारी ‘टॉम टॉम’च्या परीक्षणातून पुढे आली. ती शोचनीय आहे. जो देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघतो आहे, त्या देशातील जनतेचे इतके अमूल्य तास दररोज वाहतूककोंडीत जाऊन कसे चालेल? वाहतूककोंडीची महासत्ता हे चित्र आता तरी बदलावेच लागेल. रस्ते व्यवस्थापन हे आपल्याकडे एक मोठे आव्हान असले तरी ते पेलावेच लागेल.

महानगरांतील वाहतूककोंडी हा विषय आपल्याकडे दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. या समस्येमुळे मोठय़ा शहरांतील नागरिक मेटाकुटीला आले आहेत आणि ही कोंडी फोडण्याचा रामबाण उपाय कोणीच सांगत नाही. आता तर वाहतूककोंडीत आपल्या देशातील तीन महानगरांनी जगातील पहिल्या दहात स्थान पटकाविले आहे. म्हणजे जिथे पुढे हवे तिथे मागे आणि नको तिथे मात्र पहिला नंबर अशी ही कथा! बंगळुरू, मुंबई, पुणे वाहतूककोंडीत पहिल्या पाचात आहेत आणि दिल्ली आठव्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क, लंडन, शांघाय, बँकॉक वगैरे महानगरे तर या यादीत आपल्या आसपासही नाहीत. एकीकडे आपण दिवसाला हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणत आहोत आणि दुसरीकडे आपली महानगरे सार्वजनिक वाहतुकीच्या त्रासाला कंटाळून लोकांनी खासगी वाहनांचा वापर करून आपापल्यापुरता प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी भयाण होत चालला आहे. महानगरात वाहनांचा वेग ताशी किमान पंचेचाळीस किलोमीटर इतका तरी हवा. मात्र आपल्याकडे तो वीसपेक्षा खाली आहे. मोबाईल आणि ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) यंत्रावर नकाशामार्ग दाखविणाऱ्या ‘टॉम टॉम’ या परदेशी कंपनीने गेल्या वर्षभर केलेल्या निरीक्षणानंतर रस्त्यांवरील वाहतूककोंडीविषयी आपल्या महानगरांची अवस्था जगासमोर आली आहे. दररोजचा तास-दीड तास असा ट्रफिकमधील कालावधी धरला तर मुंबईकराचे वर्षभरातील तब्बल आठ दिवस, सतरा तास हे

ट्रफिक जॅममध्ये

जातात. त्याखालोखाल पुणेकरांचे आठ दिवस एक तास जातात. तर, कोंडीत पहिल्या नंबरवर असलेल्या बंगळुरूवासीयांचे दहा दिवस तीन तास हे ट्रफिकमध्ये अडकून जातात. आपल्या देशातील मनुष्यबळ वाहतूककोंडीमुळे कसे वाया जाते हे या निमित्ताने साऱ्या जगासमोर आले. प्रवासासाठी लाखो मुंबईकर उपनगरी रेल्वेचा वापर करीत असले, तरी स्टेशन ते कार्यालय अथवा घर यांमधील कोंडीत ते अडकतातच. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, मुंबई आणि उपनगरांत पस्तीस लाखांहून अधिक वाहनांची नोंद झालेली आहे. पाच वर्षांपूर्वी वीस लाखांवर असलेली वाहने अर्ध्या दशकातच पस्तीस लाखांवर पोहोचली. त्यात रोज सातशे वाहनांची नव्याने भर पडतेय. सुमारे पंचेचाळीस हजारांवर ‘ओला’-‘उबेर’सारख्या खासगी टॅक्सी दिवसाला बारा ते पंधरा फेऱ्या करीत आहेत. 2001 सालात सातशेवर असलेल्या स्कूलबसेस आता चार हजारांपर्यंत पोहोचल्या आहेत. हे आकडे नक्कीच धडकी भरवणारे आहेत. मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर असे रेल्वेचे जाळे आहे. लाखो मुंबईकर रेल्वेने प्रवास करतात. आता उपनगरांपर्यंत मेट्रोही धावणार आहे. तरीही वाहतूककोंडीतून सुटकेची कोणतीच आशा दिसत नाही. उड्डाणपूल झाले, रस्ते रुंद झाले, तरी वाहतूककोंडीचे शेपूट सरळ होऊ शकलेले नाही. त्यासाठी मुंबईची भौगोलिक परिस्थिती आणि वर्षानुवर्षे अव्याहत आदळणारे मानवी लोंढे ही प्रमुख कारणे आहेत. तिकडे बंगळुरू, पुण्यासारख्या महानगरांमध्ये तर रेल्वेचे जाळेही नाही; सगळा ताण रस्त्यावरच आहे. शिवाय

वाहनांच्या वाढत्या संख्येचा महापूर

थांबणारा नाही आणि रस्ता कितीही रुंद केला तरी त्याला मर्यादा आहेत. अशी ही विचित्र कोंडी आहे. या कोंडीत शहरांबरोबर ग्रामीण भागातील तालुक्याची ठिकाणे, छोटी शहरेही सापडली आहेत. वरच्या आळीतून खालच्या आळीत पोहोचेपर्यंत ‘पंचक्रोशी’ आठवते. एक एसटी आली तरी वाहतुकीचे बारा वाजतात, ही गावागावांतील अवस्था आहे. मुंबईत आजमितीस एक किलोमीटर अंतरात एका वेळी चारशे तीस वाहने असतात, असे एका पाहणीत आढळले. जे अंतर अर्ध्या तासाचे असते, ते पार करण्यासाठी तास-दीड तास लागतो. वाहतूककोंडीचा परिणाम वेळ वाया जातो इतक्यापुरताच नाही. कोंडीमुळे लोक प्रचंड मानसिक तणावाखाली जातात. शिवाय वेळेत पोहोचता आले नाही तर होणाऱ्या भयंकर परिणामांचे टेन्शन आणि त्यामुळे होणारी चिडचिड वेगळीच. रस्त्यातच दुसऱ्या चालकाशी खटके उडू लागतात. रुग्णवाहिकेत बसलेल्या नातेवाईकांचे हृदयाचे ठोके रुग्णापेक्षाही जोरात पडू लागतात. मुलाखतीला, परीक्षेला निघालेले उमेदवार तर अक्षरशः देवाचे नामस्मरण करत असतात. हिंदुस्थानातील भयंकर वाहतूककेंडीविषयी सणसणीत अंजन घालणारी आकडेवारी ‘टॉम टॉम’च्या परीक्षणातून पुढे आली. ती शोचनीय आहे. जो देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघतो आहे त्या देशातील जनतेचे इतके अमूल्य तास दररोज वाहतूककोंडीत जाऊन कसे चालेल? वाहतूककोंडीची महासत्ता हे चित्र आता तरी बदलावेच लागेल. रस्ते व्यवस्थापन हे आपल्याकडे एक मोठे आव्हान असले तरी ते पेलावेच लागेल.