सामना प्रभाव – करजुव्यात वाळूमाफियांचे थैमान; सामना ऑनलाइनला वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचा आदेश

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे वाळूमाफियांनी थैमान घातले आहे. करजुवे आणि वातवाडी येथे संक्शन पंप लावून वाळू उपसा सुरू आहे. करजुवे येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून शनिवार आणि रविवारी वाळूमाफियांचे परिसरात धूमशान सुरु असते हे वृत्त सामना ऑनलाइनने आज सकाळी प्रसिद्ध करताच संगमेश्वर तालुक्यातील प्रशासनाची झोप उडाली आहे.जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी वाळूमाफियांची गंभीर दखल घेतली असून उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही वर्षांत करजुवे हा वाळू माफियांचा अड्डा झाला आहे.संक्शन पंप लावून वाळू उपसा केला जातो.करजुवे वातवाडी आणि सुर्वे वाडी येथे होणारे बेकायदेशीर वाळू उत्खनन हे पर्यावरणासाठी घातक आहे.पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी करजुवेतील वाळू उत्खननाबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही तहसीलदार आणि खनिकर्म विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे वृत्त आज सामना ऑनलाइनने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली आहे.