रोखठोक : गांधीजी, सावरकर आणि आपण सारे!

816

rokhthokकधी गांधीजी तर कधी सावरकरांना खलनायक ठरवले जात आहे. गोडसे हा ज्यांना महानायक वाटतो त्यांनी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. गांधीजींऐवजी गोडसेने बॅ. जीनांवर पिस्तूल रिकामे केले असते तर देशाचा भूगोल आणि इतिहास बदलला असता. गांधीजी आणि सावरकर बनणे कठीण आहे, हे नवीन पिढीला कधी समजणार?

गांधीजी आणि सावरकर यांना कायम आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. स्वातंत्र्य लढा ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला ती पिढी आज जवळ जवळ संपली आहे, पण स्वातंत्र्याचा गुलकंद जे चघळत आहेत व त्यासाठी ज्यांनी घामाचा एक थेंबही गाळला नाही अशी नवी पिढीही गांधीजी आणि सावरकरांना खलनायक ठरवत आहे. गांधीजींना खलनायक ठरवण्यात जसे गुजराती पुढे तसे सावरकरांना खलनायक ठरवण्यात मराठी पुढे आहेत. काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे लोक सावरकरांना मानायला तयार नाहीत. त्यांच्या मते सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागून सुटका करून घेतली, तर हिंदुत्ववाद्यांच्या मते गांधीजी यांच्यामुळेच देशाची फाळणी झाली. त्यामुळे ते राष्ट्रपिता, महात्मा नाहीत. ते स्वातंत्र्याचे नायक नाहीत. ते खलनायक आहेत. गोडसे यांनी गांधींची हत्या केली ते बरेच झाले असे ज्यांना वाटते त्यांनी एक प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा. गांधीजींपेक्षा बॅ. जीना हेच हिंदुस्थानच्या फाळणीचे खलनायक होते. गोडसेने त्याचे रिव्हॉल्व्हर जीनांवर रिकामे केले असते तर नथुराम गोडसे हा देशाचा महानायक ठरला असता. या देशात गांधीजी, सावरकरांऐवजी गोडसेचेच पुतळे उभे राहिले असते.

दोघेही बॅरिस्टर
गांधीजी आणि सावरकर हे दोघेही इंग्लंडमधून म्हणजे ज्या देशातल्या साम्राज्यशाहीचे जोखड झुगारून देण्याची हिंदुस्थानची धडपड चालू होती त्या देशातून उच्च शिक्षण संपादन करून जनतेसमोर आले. गांधीजी आणि सावरकर दोघेही ब्रिटिश कायद्याचे बॅरिस्टर होते. इंग्लंडचा कायदा, त्यांची मूल्ये व इंग्रज बादशहाचा ‘काळा डगला’ घेऊन ते हिंदुस्थानात आले होते. पण त्यांनी पुढे तेच काळे डगले घालून त्याच ब्रिटिश सत्तेला गाडून टाकण्यासाठी कबर खोदणाऱ्यांची भूमिका घेतली. हा खरा इतिहासातील विचित्र योगायोग आहे. खरे तर दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात अहिंसेची पालखी वाहणारे महात्मा गांधी हे तर तेथील हुकूमशहा जनरल स्मटस्चे मित्र होते. पण तिथेच जेव्हा त्यांनी तिथल्या हिंदी लोकांना ब्रिटिश नागरिकांचे हक्क देण्यात यावेत अशी मागणी केली तेव्हा त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. इतके होऊनही महात्मा गांधी साम्राज्याच्या विरोधात जायला तयार नव्हते. त्याच गांधीजींनी पुढे ब्रिटिश साम्राज्यशाहीला सुरुंग लावला.

गोडसे भक्ती
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात ज्यांना आरोपी करण्यात आले होते त्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या आता भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत. भोपाळमध्ये प्रचार करताना या साध्वीने गांधीजींवर टीका करून गोडसेला देशभक्त ठरवले. एखाद्याने खून किंवा हत्या केली म्हणून तो देशद्रोही ठरत नाही, पण कुणी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधींची हत्या केली असेल तर ती व्याख्या बदलावी लागेल. गांधीजींचे पुतळे तोडा व गोडसेचे पुतळे उभारा असे बोलणारे छगन भुजबळ आज शरद पवारांचे सहकारी आहेत व मुंबई पालिकेतील उपायुक्त निधी चौधरी यांनी गोडसेवर उपाहासात्मक टिपणी केली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आंदोलन करतात. हे सरळ सरळ ढोंग आहे. सावरकरांप्रमाणे गांधीजींनी अंदमानातील यातना भोगल्या नसतील, पण स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वीकारलेला मार्ग यातना आणि आत्मक्लेशाचाच होता. सावरकर क्रांतिकारक होते, पण स्वातंत्र्यासाठी जनतेचा उठाव घडवून वणवा पेटवण्याची ताकद गांधीजींच्या शब्दांत होती. 1920-21 च्या दरम्यान गांधी बंडखोर बनले. त्यांनी विधान केले की, ‘ब्रिटिश सरकार हे पापी सैतान आहे आणि या सैतानाचा नायनाट केलाच पाहिजे. सैतानाशी तडजोड करणे शक्य नसते.’ या विधानाने कायदेभंग, असहकाराच्या चळवळीची वाटचाल सुरू झाली. ब्रिटिश साम्राज्य हादरले. देशातील शाळा, कॉलेजे ओस पडली. कोर्टावर बहिष्कार टाकला गेला. कित्येक नामदारांनी सरकारने दिलेल्या सन्मानाच्या पदव्या परत केल्या. परदेशी कपडय़ांची होळी करण्यात आली. हरताळ आणि संप करून लाखो लोक रस्त्यावर उतरले. हे सर्व त्या काळात घडले जेव्हा दळणवळण व संपर्काची साधने जवळजवळ नव्हती. रेडिओ, टीव्ही, मोबाईल एवढेच काय, साधे फोनही नव्हते; पण गांधीजी काय सांगतात हे देश कानात प्राण आणून ऐकत होता. आज गांधीजींना खलनायक ठरवणाऱयांनी हा इतिहास डोळय़ाखालून घातला पाहिजे.

भय नष्ट केले
गांधीजींचे सगळय़ात मोठे योगदान कोणते? अहिंसा हेच त्यांनी शस्त्र बनवले. गांधीजींनी सर्वप्रथम भय नष्ट केले. जनतेच्या मनातील भीती नष्ट झालेली पाहून ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा राग अनावर झाला. त्यांची बेचैनी वाढली. हरताळ, सार्वत्रिक संप, बहिष्कार, प्रभातफेऱ्या, गांधीटोपी, रस्त्यावर पोलिसांची पर्वा न करता ‘महात्मा गांधी की जय’च्या घोषणा ही हत्यारे हातात पाजळवीत देशभर जनतेने उठाव केला. हे सर्व अहिंसक उठाव आहेत असे गांधीजी सांगत. चौरी चौरा येथे पोलिसांनी तिथल्या शेतकऱयांवर बेछूट गोळीबार केला. त्याचा बदला म्हणून शेतकऱयांनी पोलिसांना ठार केले. तेव्हा गांधीजींनी संपूर्ण सत्याग्रहाची चळवळ मागे घेतली. त्या वेळेस तुरुंगात असलेल्या नेहरू आणि इतर पुढाऱयांनी गांधीजींच्या या निर्णयाला विरोध केला. तेव्हा त्यांना गांधीजींनी बेधडकपणे सांगितले की, ‘तुरुंगात असतात ते कायद्याच्या चौकटीत मेलेले असतात.’

अस्तित्व हेच सामर्थ्य
सावरकर आणि गांधीजी फक्त राष्ट्रीय नव्हते, तर महा-राष्ट्रीय होते. गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले. सावरकरांनी पर्वा न करता सत्य सांगितले. गाय ही देवता नसून एक उपयुक्त प्राणी आहे असे त्यांनी सांगितले. सावरकर आज हयात असते तर आजच्या हिंदुत्ववादी उन्मादक गोरक्षकांनी त्यांना मारलेच असते. सावरकरांनी ‘फाळणीस’ विरोध केला म्हणून ते महान; पण फाळणी स्वीकारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही व ब्रिटिश जाताना तुकडा पाडूनच जाणार आहेत हे स्पष्ट झाल्यावर गांधीजींपुढे दुसरा पर्याय काय होता? सावरकर विरोध करत राहिले, पण त्यांच्याकडे संघटन नव्हते. आज ज्यांना गोडसे प्रिय वाटतात त्यांना हा प्रश्न पडायला हवा की, गोडसेने फाळणीनंतर गांधीजींना मारण्यापेक्षा फाळणीची रेषा ठरण्याआधी बॅ. जीनांस का उडवले नाही? एका निःशस्त्र वृद्ध फकिरावर गोळय़ा चालवणे सहज सोपे होते. गोडसेने ते केले हे काही देशभक्तीचे सर्वोच्च लक्षण नाही, पण तो देशद्रोहदेखील नाही; पण गांधीजींचे पुतळे तोडून गोडसेचे पुतळे उभारा असे सांगणे हा मात्र देशद्रोहच आहे. हिंदुस्थानच्या नोटेवरून गांधीजींचे चित्र हटवा असे सांगणारे मूर्ख आहेत. तसे केल्याने घसरलेल्या रुपयाची किंमत वाढणार आहे काय? सध्या ऊठसूट गांधीजींवर प्रहार करण्याची फॅशन रूढ झाली. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष असतीलही; पण सावरकर यांच्या प्रतिमेचा भंग करण्याइतकेच काय, त्यांच्या पायाच्या धुळीइतकेही शौर्य राहुल गांधींनी गाजवलेले नाही. गोडसेभक्त गांधीजींच्या पुतळ्यांवर गोळ्या चालवून मर्दानगी दाखवतात. हा भंपकपणा ठरतो. मुंबई पालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना या सर्व गोष्टींचा उबग आला व त्यांनी संतापाने लिहिले, तोडा-फोडा एकदाचे गांधीजींचे पुतळे आणि करा उदोउदो गोडसेंचा. हा उपहास ज्यांना समजला नाही त्यांनी निधी चौधरींनाच गोडसेभक्त ठरवून कारवाई करायला भाग पाडले. ज्यांना गांधीजी समजले नाहीत त्यांच्या हाती राजशकट जात राहिले. त्यांना गांधीजीही समजले नाहीत आणि सावरकरही समजले नाहीत. गांधीजी आणि सावरकरांची गुरुकिल्ली तरी कोणती? तर आत्मबळ! (सोल फोर्स). याच आत्मबळाने सावरकर अंदमानला दोन जन्मठेपा भोगत राहिले. त्यांना विश्वास होता, पन्नास वर्षे या देशावर ब्रिटिश राजवट कदापि टिकणार नाही. गांधीजी म्हणत, माझ्याभोवती एकही अनुयायी नाही जमला तरी हरकत नाही. माझ्या कार्याला मी एकटा पुरे आहे. मी आहे. तेव्हा मी आपल्या आत्मिक बळावर वाटेल ते सत्कार्य घडवून आणेन! गांधीजी म्हणजे काय? शस्त्र, अस्त्र, संपत्ती, नोकर, शिपाई, लष्कर, आगबोटी, विमाने यांनी संपन्न असे इंग्रज सरकार एका बाजूला व दुसऱ्या बाजूस दूधसुद्धा न पिणारा, मीठसुद्धा न खाणारा, रोज जेवणही न करणारा मनुष्य! हा इतका अशक्त, कृश, शालीन मनुष्य मनाने पोलादी होता. त्याचे एकटेपण हे त्याचे सामर्थ्य होते. त्यांचे अस्तित्व म्हणजेच सामर्थ्य होते. ते कधीच संपवता येणार नाही!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या