सचिन, गांगुली, लक्ष्मण यो यो टेस्टमध्ये फेल झाले असते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघात प्रवेश करण्यासाठी क्रिकेटपटूंना तीन गोष्टींमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. प्रदर्शन, यो यो टेस्ट व दोन किमी धावण्याची शर्यत या तीन बाबींमध्ये पास झाल्यानंतरच क्रिकेटपटूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होतात. याप्रसंगी हिंदुस्थानचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग एका ‘शो’मध्ये म्हणाला की, आमच्या काळात यो यो टेस्ट असती तर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण व सौरभ गांगुली हे तिन्ही खेळाडू त्यामध्ये फेल झाले असते. त्यामुळे त्यांना संघातही स्थान मिळाले नसते.

बीप टेस्टमध्येही ते पास होत नव्हते

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, आमच्या काळात बीप टेस्ट होत असे. या टेस्टचा पासिंग स्कोअर 12.5 इतका असायचा. मात्र सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण व सौरभ गांगुली हे बीप टेस्टमध्येही पास होत नसे. त्यांचे गुण हे नेहमी कमी असायचे.

दोन्ही टेस्ट अनिवार्य

सध्या हिंदुस्थानी संघात प्रवेश करण्यासाठी खेळाडूंना यो यो व दोन किमी धावण्याची शर्यत या दोन टेस्ट देणे अनिवार्य करण्यात आले आहे. वेगवान गोलंदाजांना 8 मिनिट व 15 सेकंदांत दोन किमीची शर्यत पूर्ण करावी लागते. तसेच फलंदाज व यष्टिरक्षकाला हीच शर्यत 8 मिनिट व 30 सेकंदांत पूर्ण करावी लागते. तसेच यो यो टेस्टमध्ये खेळाडूंनी 17.1 इतका स्कोअर करणे गरजेचे असते.

कौशल्याची नितांत गरज

विराट कोहलीची टीम इंडिया सध्या फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित करीत आहे. यावर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, एखादा खेळाडू फिट आहे, पण त्याच्याकडे कौशल्य नाही. तर मग संघाला त्याचा फायदा होणार नाही. खेळाडूंना त्यांच्या कौशल्याच्या जोरावर संधी द्यायला हवी. त्यानंतर त्या खेळाडूच्या फिटनेसवर मेहनत घ्यायला हवी असेही त्याला वाटते.