
शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे, हाफ चड्डी घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे, अशा शब्दांत काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शेतकरी आंदोलनावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जयपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘लव्ह जिहाद’ विषयावर बोलता, विवाहासंबंधी कायदे करता आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहात असा आरोप त्यांनी केला.
इतिहास साक्षी आहे, देशात बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते, तर काही मोजकेच इतर पक्षांचे होते. भाजपमध्ये तर एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही. मला याचं वाईट वाटतं की, सध्या देशातील शेतकरी केवळ आंदोलनच करत नाहीत, तर त्यांच्या मनात भीतीदेखील आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याची त्यांना चिंता असल्याचं ते म्हणाले.
केंद्राने समजून घ्यायला हवे
केंद्राने हे समजून घ्यायला हवं की, काही कायदे मागे घेतल्याने कोणतंही नुकसान होणार नाही. जर केंद्र सरकारने कायदे मागे घेतले तर आम्ही त्यांचे आभार मानू. कायद्यात सुधारणा करणे, ते मागे घेणे किंवा माफी मागणं ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे नेत्यांची उंची वाढते, ही लाज वाटण्याची बाब नाही, असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

























































