दुर्गम वाडी-वस्ती राहिली दूर, चक्क शहरालगतच्या उपनगरातच महापालिकेची प्राथमिक शाळा जागा मिळेल तिथे भरत असल्याचे विदारक चित्र आहे. विशेष म्हणजे जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हेच राज्याचे शिक्षणमंत्री असताना, चिमुकल्यांची शाळा कधी किराणा दुकानाच्या दारात, अंधार असलेल्या तालमीत तर कधी मंडळाच्या जुन्या हॉलमध्ये भरविली जात आहे. जवळपास 200हून अधिक विद्यार्थी उघडय़ावर शिकत आहेत.
शिष्यवृत्ती स्पर्धेत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांचा लौकिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. यासोबत राज्यामध्ये यंदा नवी शालेय पुस्तके आणि नवा गणवेष विद्यार्थ्यांना देऊन, शिक्षणमंत्री शिक्षणासाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला कार्यक्रम राबवित असल्याचा आव आणत आहेत. परंतु दीपक केसरकर पालकमंत्री असलेल्या कोल्हापुरात मात्र शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढणारी स्थिती पाहायला मिळत आहे.
शहरातील रावसाहेब विचारे यांच्या नावाने असलेली आणि पटसंख्येमुळे काही वर्षांपूर्वी कणेरकरनगर परिसरात स्थलांतर केल्यानंतर शून्य पटापासून सुरू झालेल्या या शाळेत सध्या दोनशेहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. निधीअभावी प्रशासनाने इमारतच उभारली नसल्याने विद्यार्थ्यांना उघडय़ावरच शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. वर्ग तर सोडाच विद्यार्थ्यांना बसायला साधा बेंच नाही. तरीसुद्धा एकाच खोलीत चार वर्ग भरवायला प्रशासनाने दिलेली परवानगी विचार करायला लावणारी आहे. खोलीत पहिलीचे विद्यार्थीच बसत असून, उर्वरित वर्गांना कोणाच्या तरी दारात, किराणामाल दुकानाच्या दारात, तरुण मंडळाच्या अंधाऱ्या हॉलमध्ये बसून शिक्षण घेण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता महानगरपालिका शिक्षण विभागाकडूनही बोलणे टाळले जात आहे.





























































