
सामना प्रतिनिधी । मुंबई
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांचे मुक्तता अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतले. या प्रकरणातील एक संशयित ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांचा मुक्तता अर्ज गेल्याच आठवडय़ात दाखल करून घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर साध्वी आणि समीर कुलकर्णी या दोघांचे अर्ज दाखल करून घेत तीनही अर्जांची सुनावणी खंडपीठाने १३ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) वरील तिघांसह एकूण ११ जणांना अटक केली असून या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहितेसह मोक्कासारख्या गंभीर कायद्याखाली खटला दाखल केला. मात्र नंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला.


























































