विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही पोलिसांसह पालक आणि शालेय प्रशासनाची जबाबदारी आहे. विशेषतः विद्यार्थिंनीमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून काम केले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. शालेय विद्यार्थी सुरक्षा आणि पॉक्सो कायद्यासंदर्भात येरवड्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, उपायुक्त आर. राजा, एसीपी आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्यासह विविध शाळांतील मुख्याध्यापक आणि पालक उपस्थित होते.

यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना अवतीभवती सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पालकांसह संबंधित प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. प्रामुख्याने नागरिकांनी स्वतःच्या पाल्यांबाबत दक्ष राहणे महत्वाचे आहे. विद्यार्थी – विद्यार्थिंनीचा घरापासून शालेय प्रवास सुरक्षित आहे का, शाळा परिसरानजीक मुलींवर कोणाची नजर आहे का, रिक्षा- बसप्रवासात मुलींची छेडछाड, अश्लील हरकतींना सामोरे जावे लागते का, गुड-टच, बॅड टचद्वारे पाल्यांना आलेल्या अनुभवातून शाळांसह पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्याशिवाय आपल्या पाल्यांचे मित्र-मैत्रिणी, त्यांच्यामधील सुसंवाद, शालेय वर्तुणूकीबाबत वारंवार आढावा घेतल्यास अघटित घटनांना आळा बसणे शक्य होणार आहे. विशेषतः मुलींबाबत काही अघटित प्रकार घडले आहेत का, घरामध्ये मुला-मुलींच्या वागणूकीत काही बदल जाणवत आहेत का, यासंदर्भात माहिती घेउन तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुलींनो घाबरू नका, पोलिस कायम तुमच्यासोबत

शालेय विद्यार्थ्यांना बहुतांश काही अघटित घटनांना सामोरे जावे लागते. विशेषतः घर ते शाळा प्रवासादरम्यान मुलींना अश्लील हरकतींचा सामना करावा लागल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे विविध शाळांतील विद्यार्थिंनीनी न घाबरता तक्रार करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रत्येक शाळेतील तक्रार पेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार संबंधित तक्रारींची दखल घेउन कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे मुलींनो तुम्ही घाबरू नका, फक्त तक्रार करा, पुणे पोलिस तुमच्या मदतीला कायम धावणार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.