
आग्र्याच्या प्रसिद्ध ताज महाल या वास्तूच्या परिसरात काही जणांनी भगवे झेंडे फडकवत जय श्रीरामचे नारे दिल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून ते एका हिंदू संघटनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणी हिंदू युवा वाहिनी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव ठाकूर, सोनू बघेल, विशेष कुमार, ऋषी लवानिया अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हे चौघे जण ताज महालात पोहोचले. ते आधी ताज समोरील लाल दगडाच्या बाकड्यावर बसले.
मग काही वेळाने त्यांनी आपल्या खिशातून भगवे झेंडे काढले आणि ते ताज महालासमोर फडकवू लागले. या दरम्यान त्यांनी हर हर महादेव, जय श्री राम अशाही घोषणा दिल्या. ताजच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सीआयएसफच्या जवानांना सुरुवातीला आधी काहीच कळलं नाही. पण, त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ताबडतोब या चौघांना पकडलं आणि ताजगंज पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकाराचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
या पूर्वीही ताजमहालात हिंदू जागरण मंच या संघटनेच्या कार्यकर्त्यानेही हा प्रकार केला होता. 25 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमित्ताने या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यांसोबत भगवा झेंडा घेऊन ताजमहाल परिसरात प्रवेश केला. तिथे बसून त्याने शिवपूजाही केली होती.



























































