नम्रता, संयम, भक्तीने जीवनाची दिशा बदलते, वाशीमध्ये श्रीरामनन यांच्या सत्संगाला मोठा प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणसाने आपले जीवन नम्रता आणि भक्तीच्या मार्गाने जगले पाहिजे. जीवनात जर नम्रता, संयम, भक्ती आणि सामंज्यसपणाचा समावेश असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन इसईकवी श्रीरामनन यांनी महापेरियावा या विशेष कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती स्वामिगल यांची शिकवण आयुष्यामध्ये किती महत्त्वाची आहे यावरही मार्गदर्शन केले.

सॅफ्रॉन इंटरटेंन्टमेंट डिव्होशनली आणि गिरी या संस्थेच्या वतीने नवी मुंबईमध्ये प्रथमच महापेरियावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी श्रीरामनन यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले की, कांची कामकोटी पीठाचे चंद्रशेखर सरस्वती स्वामिगल यांनी दिलेली शिकवणही माणसाला स्वतःच्या विकासासाठी फार महत्त्वाची आहे. महापेरियावाचे तत्त्व आणि मार्गावर जर माणसाने मार्गक्रमण केले तर त्याच्या जीवनातील तणाव कायमस्वरूपी निघून जाईल. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तणाव वाढण्याचे प्रमाण फार वाढले आहे. आपण जर भक्तीच्या मार्गावर चाललो तर आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो, असाही संदेश श्रीरामनन यांनी यावेळी दिला. याप्रसंगी रेडिओ सिटीचे सीईओ अशित कुकीअन, ओएमजी ग्रुपचे सीईओ कार्तिक शर्मा, श्रीधर शर्मा, गिरी ट्रेडिंगच्या रेखा, सीटी युनियन बँकचे विभागीय व्यवस्थापक मनीष, सीटी युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी कुणाल आदी उपस्थित होते.

नृत्याविष्कारांचे सादरीकरण

वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामनन यांच्या महापेरियावामध्ये त्यांनी जीवनाच्या अनेक पैलूंचा उलगडा केला. सुनीता आणि रेमा यांनी श्रीगणरायाचे आणि शंकराचे नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या उपक्रमाला भक्त गणांचा चांगला प्रतिसाद मिळाला.