सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. ते 75 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या रॉय यांच्यावर मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांचे पार्थीव 15 नोव्हेंबर रोजी लखनऊमध्ये आणले जाईल. येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.

सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारच्या अररिया जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव सुधीर चंद्र रॉय आणि आईचं नाव छवी रॉय होतं. कोलकातामध्ये सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोरखपूरमध्ये एका सरकारी कॉलेजमधून यंत्र अभियांत्रीकीचं शिक्षण घेतलं होतं. गोरखपूरमधून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती.

सुब्रत यांनी अगदी सामान्य व्यक्ती ते उद्योगपती अशी आपली ओळख निर्माण केली. 70 च्या दशकात तर ते स्कूटरवरून प्रवास करायचे, अशी माहिती मिळते. लोकांच्या छोट्या गुंतवणुकीच्या आधारावर त्यांनी साम्राज उभं केलं. 1978 मध्ये सहाराची सुरुवात करून त्यांनी जगभरात आपला व्यवसाय पसरवला होता.