
उदगीर येथे होणाऱ्या 95 व्या अखील भारतीय साहित्य संमेलनामध्ये मराठीसोबतच कन्नड, तेलगू आणि उर्दू भाषेतील साहित्यावर मंथन होणार आहे. येथे होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बाज काही वेगळाच असणार आहे. उदगीर शहर सीमावर्ती भागात असून बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत हे शहर वसले आहे, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या त्याला वेगळे महत्त्व आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेजवळ हे शहर असल्यामुळे येथील एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. प्रामुख्याने येथे कन्नड भाषेचा प्रभाव जाणवतो. मराठवाड्यात येण्यापूर्वी उदगीर चा समावेश कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात होता. हैदराबाद येथून जवळच असल्यामुळे उर्दू भाषेचाही प्रभाव येथे जाणवतो. साहित्य संमेलनाचे ठिकाण उदगीर येथे निश्चित झाल्यावर पहिल्या बैठकीतच कौतिकराव ठाले व इतर साहित्य परिषदेच्या सदस्यांना येथील काही नागरिकांनी सीमावर्ती भागातील भाषा वैविधतेची जाणीव करून दिली. या भाषा वैविधतेमुळे या साहित्य संमेलनात मराठी भाषेसह कन्नड, तेलुगु व उर्दू भाषांचाही बोलबाला असणार आहे. या तिन्हीही भाषांमधील साहित्य त्यामधील विविध पैलू यांचा उलगडा या संमेलनात होणार आहे.
या भाषेमधील साहित्यनिर्मिती, त्यावर कार्य करणारे जुने जाणते साहित्यिक, नवोदित लेखक ,कवी यांच्यासाठी हे साहित्य संमेलन पर्वणी ठरणार आहे. मराठी साहित्यामध्ये जशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती झाली -मराठीचिया अमृताची गोडी तद्वतच या तिन्ही भाषा अतिशय समृद्ध असून त्यातून विपुल अशी साहित्य निर्मिती झाली आहे. या भाषांमधील समृद्धता व वैविधता, नवनवीन प्रयोग व संशोधन यावर या साहित्य संमेलनात मंथन, वाद-विवाद व चर्चा होणे अपेक्षित आहे. या तिन्ही भाषांमधील साहित्यप्रेमींना, जाणकारांना या माध्यमातून मेजवानी मिळणार आहे.
या संमेलनासाठी वापरण्यात येणारे बोधचिन्ह हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्यामध्ये उदगीर चा भौगोलिक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा ठळकपणे दिसून येतो. मराठे आणि निजाम यांच्यामधील झालेली येथील साक्षीदार हा भुईकोट किल्ला आहे. ज्यामध्ये या लढाईत मराठी साम्राज्यातील लढवय्या शिलेदारांनी निजामाचा पराभव केला होता. या लढाईस भारतीय इतिहासात फार मोठे महत्त्व आहे, त्याची आठवण म्हणून बोधचिन्हाच्या पार्श्र्वभूमीवर या किल्ल्याची प्रतिकृती रेखाटली आहे. ‘म’ मराठी चा उल्लेख मराठी, कन्नड, तेलगू व उर्दू या भाषेमध्ये केलेला आढळून येतो. तसेच बालाघाट पर्वतरांगाच्या कुशीत उदगीर नगरी वसलेली आहे त्याचेही रेखाटन या बोधचिन्हावर पहावयास मिळते. त्याचबरोबर उदगीरमधील खादी ग्रामोद्योग व्यवसाय चांगलाच चालतो. या खादी ग्रामोद्योगातून तयार केलेले खादीचे कापड देशात तिरंगा झेंड्यासाठी वापरण्यात येते. मोरपंखाच्या माध्यमातून तिरंगा काढून याचेही रेखाटन बोध चिन्हावर समाविष्ट केले आहे. या सर्वच बाबी बोधचिन्हावर अत्यंत आकर्षक पद्धतीने रेखाटण्यात आल्या आहेत. ज्यातून उदगीरची ऐतिहासिक, साहित्यिक, भौगोलिक व सांस्कृतिक ओळख संपूर्ण जगामध्ये जाणार आहे.



























































