
सामना ऑनलाईन । शिर्डी
साईबाबांच्या शताब्दी पुण्यतिथीच्या तीन दिवस चाललेल्या उत्सवकाळात भाविकांनी साईचरणी सहा कोटींचे विक्रमी दान केले आहे. यात सोने, चांदी, रोख रकमेसह परदेशी चलनाचा समावेश आहे. या तीन दिवसांत सुमारे तीन लाख साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान, देणगीत गेल्या वर्षीपेक्षा सवा कोटीची वाढ झाली.
उत्सवकाळात दानपेटीतून 2 कोटी 52 लाख 89 हजार 426 रुपये, देणगी काऊंटरद्वारे 1 कोटी 46 लाख 50 हजार 336, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, चेक/डीडी, मनिऑर्डर आदींद्वारे 1 कोटी 41 लाख 34 हजार 500 रुपये देणगी रक्कम स्वरूपात प्राप्त झालेली आहे. 900.940 ग्रॅम सोने (रुपये 26 लाख 7 हजार 294) व 7114.800 ग्रॅम चांदी (रुपये 2 लाख 17 हजार 945) सुमारे 21 देशांमधून परदेशी चलनाद्वारे 24 लाख 55 हजार रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. भिक्षा झोळीत गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, गूळ व खाद्यतेल आदींद्वारे 2 लाख 67 हजार 412 रुपये व 92 हजार 666 रुपये रोख रक्कम अशी एकूण 3 लाख 60 हजार 78 रुपये इतकी देणगी प्राप्त झालेली आहे. गेल्या वर्षी 4.71 कोटी व 2018 मध्ये 5.97 कोटी रुपये देणगी प्राप्त झाली होती.
































































