आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून तरुणींची करायचा फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्न जुळणाऱ्या साइटवर तरुणींना आयपीएस असल्याचे सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्या ठगाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. अभिजित गाढवे असे त्याचे नाव आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयात पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीचा रहिवासी असलेल्या अभिजितने लग्न जुळणाऱया साइटवर नाव नोंदवले होते. त्याने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे भासवले. एप्रिल महिन्यात त्याला एका तरुणीची रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर अभिजित त्या तरुणीला भेटला. त्याने आपण आयपीएस अधिकारी असून आपली ओळख उघड होऊ नये म्हणून साध्या वेशात काम करतो अशा भूलथापा मारल्या. वडील लष्करातून निवृत्त झाले असून गावी स्ट्रॉबेरीची बाग असल्याचे भासवले. तसेच आपली विमानतळावर ओळख असल्याचे सांगून त्याने तरुणीकडून 73 हजार रुपये घेतले. तिला बनावट नियुक्तीपत्र दिले.

नियुक्तीपत्राबाबत तरुणीने तिच्या मित्राकडे विचारणा केली तेव्हा हा प्रकार समोर आला. फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी याने तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे, कोकणे, पाटील, खैरमोडे, भुवड, बंगाळे, जाधव यांनी तपास सुरू केला. फसवणूक करणाऱया अभिजितची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी अभिजितला ताब्यात घेऊन अटक केली.

 ‘यूटय़ूब’ आणि ‘क्राइम पेट्रोल’सारख्या मालिका पाहून गेल्या वर्षभरापासून अभिजीत फसवणूक करत होता.  फसवणूक केल्यानंतर त्याच्या घरचा खोटा पत्ता द्यायचा. फसवणुकीच्या पैशातून तो महागडे कपडे आणि मौजमजा करत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.