सैनिकहो तुमच्यासाठी…! सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना नृत्य-संगीतमय सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच सीमेवर तैनात असणाऱया जिगरबाज जवानांची करमणूक व्हावी या उद्देशाने मुंबईतील मुक्ता इव्हेंट ऍण्ड हॉस्पिटॅलिटीच्या वतीने ‘सलामी’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम नुकताच राजस्थान बॉर्डरवर सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे, हिंदुस्थानी राष्ट्रगीतासह नुकताच राज्यगीताचा दर्जा मिळालेले ‘पद्मश्री’ शाहीर कृष्णराव साबळे यांच्या पहाडी आवाजाने अजरामर झालेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याचे कलाकारांनी वाद्यवृंदाच्या माध्यमातून सादरीकरण केले.

सीमा सुरक्षा दलाचे जवान आपल्या जिवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर अविरतपणे पहारा देत असतात. या जवानांची एक संध्याकाळ संगीत, लोकनृत्याने बहरावी ही संकल्पना 2002 साली सफरसम्राट दिवंगत राजा पाटील यांच्या मनात आली. तेव्हापासून आजतागायत हिंदुस्थानी जवानांसाठी दरवर्षी मुक्ता इव्हेंट ऍण्ड हॉस्पिटॅलिटी आणि एकता मंच संस्थेमार्फत ‘सलामी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा 4 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत संतोष परब यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून हा कार्यक्रम पार पडला. तब्बल 45 कलावंत आणि तंत्रज्ञांच्या चमू यासाठी राजस्थानात दाखल झाला होता. जोधपूर, पोखरण, जैसलमेर (उत्तर), जैसलमेर (दक्षिण), रामगढ, खाजूवाला, बिकानेर, सांचू या राजस्थानातील बॉर्डरवरच्या जवानांच्या करमणुकीकरिता कार्यक्रम सादर करण्यात आला.

सैनिकांचे आयुष्य जवळून बघता आले

बॉर्डरवरील नऊ प्रयोगांसाठी प्रत्येक दिवशी 150 ते 350 किमीचा कडक उन्हातला प्रवास आणि संध्याकाळी कडाक्याच्या थंडीतला प्रयोग असा आमचा दिनक्रम असायचा. ‘सलामी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सैनिकांचा दिनक्रम, त्यांचा देशाप्रति असलेला आदर आणि कुटुंबापासून दूर राहून प्राणपणाने देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची त्यागी वृत्ती याचे जवळून दर्शन घडते. कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर मराठीसह इतर भाषिक सैनिक जेव्हा आपुलकीने भेटायला येतात, कौतुकाची थाप देतात तेव्हा मन भरून येते. या सैनिकांच्या चेहऱयावरचा विलक्षण आनंद समाधान देऊन जातो, असे लेखक-दिग्दर्शक संतोष परब यांनी सांगितले.