बॉलिवूड चित्रपटांच्या कमाईपेक्षा ‘या’ हॉलिवूड अभिनेत्याचे मानधन जास्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडतात. परंतु एका हॉलिवूड अभिनेत्याने या तिघांच्या चित्रपटांच्या कमाई एवढं मानधन घेतलं आहे. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते डेनियल क्रेग यांना जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठी जे मानधन मिळणार आहे ते सलमान, आमिर आणि शाहरूख यांच्या चित्रपटांच्या कमाईपेक्षाही जास्त असणार आहे. क्रेग यांना जेम्स बॉन्ड सीरिजच्या पुढील चित्रपटासाठी ५ करोड पाउंड म्हणजेच ४५० कोटी रुपयांचे मानधन मिळणार आहे. बॉलिवूड चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई ही नक्कीच हॉलिवूड चित्रपटांच्या कमाईपेक्षा कमी असते. जेम्स बॉन्ड म्हणजे जगभारत प्रसिद्धीस आलेला हेर आहे. तसेच या चित्रपटांतून दाखवण्यात येणारे अॅक्शन सीन म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते.

सध्या चर्चा आहे की, ‘स्पेक्टर’ चित्रपटासाठी ३.७ कोटी पाउंड मानधन म्हणून मिळाले होते. मिरर डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट दोन तास २० मिनिटांचा आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या डेनियल क्रेग यांना स्क्रिन टाईमनुसार प्रति मिनिट ३,५७,००० पाउंड देण्यात येतील. चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षी डिसेंबरपासून सुरू होणार असून पाच महिन्यांपर्यंत चालणार आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०१९ला एमजीएस यूएसमध्ये रिलीज करणार आहे. इग्लंडमध्ये हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०१९ ला रिलीज होणार आहे. त्यानंतर अन्य देशात रिलीज करण्यात येईल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्कर पुरस्कार विजेते डॅनी बॉयल करणार आहेत. याआधी डेनियल ‘कैसिनो रॉयल(२००६)’, ‘द क्वॉन्टम ऑफ सॉलेस(२००८)’, ‘स्काईफॉल(२०१२)’ आणि ‘स्पेक्टर(२०१५)’ या चार बॉन्ड चित्रपटांत दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी डेनियल म्हणाले होते की, ‘जेम्स बॉन्डची भूमिका पुन्हा निभावण्यापेक्षा माझी नस कापून घेणे पसंत करेल.’ कारण २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्पेक्टर’या चित्रपटात काम करताना त्यांना फार थकवा आला होता. ऑस्कर पुरस्कार विजेते डॅनी बॉयल यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ७० लाख पाउंड मिळणार आहेत.