
अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे. खान पिता-पुत्रांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोमवारी मुंबई क्राइम ब्रँचचे एक पथक सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर पोहोचले होते. पोलिसांनी याप्रकरणात चौघांचे जबाब नोंदवले आहेत.
सलमानशिवाय त्याचे वडील सलीम खान आणि दोन्ही भाऊ सोहेल व अरबाज खान यांचेही जबाब नोंदवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहेत. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या एकूण 10 पथकांमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आम्ही सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्राची आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत. आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही, असे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी सांगितले. सलमान व सलीम खान यांना रविवारी धमकीचे पत्र आले होते. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सलमान आणि सलीम खान यांची अवस्था सिद्धू मुसेकालासारखी केली जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोई टोळीने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.



























































