
विलेपार्ल्यात ‘जय जय रघुवीर समर्थ’ चा जोरदार गजर घुमू लागला आहे. निमित्त आहे श्री समर्थ रामदास स्वामी आणि श्री श्रीधर स्वामी यांच्या पादुका प्रचार आणि प्रसार दौऱयाचे. यानिमित्त रामदासी संप्रदायाची भव्य भिक्षा फेरी रोजच निघणार असून, घरोघरी समर्थांच्या पादुकांच्या पूजनाचा लाभही घेता येणार आहे. या निमित्ताने 20 फेब्रुवारीपर्यंत अवघे विलेपार्ले समर्थमय होणार आहे
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खातगाव येथील आनंदी नारायण कृपा न्यासाच्या समर्थ रामदास स्वामी मठाच्या माध्यमातून श्री समर्थ रामदास स्वामी आणि श्री श्रीधर स्वामी यांच्या पादुकांचा प्रचार आणि प्रसार दौरा 13 फेब्रुवारी
ते 23 फेब्रुवारीदरम्यान विलेपार्ले येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघात होत आहे. या निमित्ताने समर्थांच्या पादुकांचे विलेपार्ल्यात आगमन झाले आहे. समर्थांच्या पादुकांसमोर भजन, प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार वासुदेव बुवा बोरसे यांचे कीर्तन, अपर्णा बेडेकर व मीरा लिमये यांचे प्रवचन तसेच उदयन आचार्य यांचे नर्मदा परिक्रमेवर प्रवचन होणार असून समारोपाचे प्रवचन समर्थ भक्त श्री मोहनबुवा रामदासी करणार आहेत.
पादुकापूजन आणि भिक्षा फेरी
श्री रामदास स्वामी यांच्या पादुका घरी आणून त्यांचे पूजन करता येणार आहे. त्याचबरोबर विलेपार्ले येथे विविध भागात ‘जय जय रघुवीर समर्थ’च्या गजरात सांप्रदायिक भिक्षाफेरी निघणार आहे. खातगाव येथील मठात वर्षभर होणाऱया विविध धार्मिक उपक्रमांसाठी ऐच्छिक निधी व भिक्षेतील धान्याचा विनियोग करण्यात येणार असल्याची माहिती समर्थ भक्त श्री मोहनबुवा रामदासी यांनी दिली. समर्थांच्या पादुकांच्या दर्शनाचा समस्त पार्लेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.


























































