Breaking – संभाजीनगरात आज रात्रीपासून संचारबंदी लागू होणार

संभाजीनगर शहरात मंगळवारी रात्रीपासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. संचारबंदीचा हा निर्णय 14 मार्चपर्यंत लागू असणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू, उद्योग कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्या बैठकीत संचारबंदीबाबतचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

संभाजीनगर शहराप्रमाणेच पुणे शहरातही रात्रीच्या सुमारास संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे पुण्यात खबरदारीचा उपाय म्हणून सात दिवसांची रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेदरम्यान सर्वसामान्यांना फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे. पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. वैध कारणांशिवाय सर्वसामान्यांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्रीचे विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातही रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे.  सोमवारी कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बोलावण्यात आली होती.  या बैठकीमध्ये पाटील म्हणाले की महामार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट वगळता शहरातील इतर सगळी हॉटेल, रेस्टॉरंट रात्री 11 नंतर बंद करण्यात यावीत.  लग्नामध्ये दोन्ही बाजूची मंडळी धरून फक्त 100 जणांना परवानगी देण्यात यावी. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.  प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात धुवावेत एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी असे आवाहनही पाटील यांनी केले आहे. आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील, असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या