
समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केल्यानंतर त्यांच्या धर्माबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अशातच त्यांच्या पहिल्या पत्नीचे वडीलही समोर आले असून त्यांनी ‘समीर हे हिंदू आहेत हे माहीत असतं तर आपल्या मुलीचं त्यांच्याशी लग्नच केलं नसतं’ असा खुलासा केला आहे.
समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांनी ‘आपल्या मुलीचे समीर यांच्याशी झालेले लग्न लव मॅरेज नव्हते. वानखेडे यांचे संपूर्ण कुटुंब मुस्लिम आहे. ते आमच्याकडे मुस्लिम म्हणूनच आले होते. ते हिंदू असल्याचे आता प्रसारमाध्यमांद्वारे कळत आहे,’ असे म्हटले आहे.
‘झायदा यांच्याशी लग्न झाले तेव्हा समीर वानखेडे यांच्या वडिलांनीही धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला. कारण त्याशिवाय त्यांचे लग्न झालेच नसते. समीर यांचे वडील हे लग्नानंतर दाऊद झाले. ते हिंदू असल्याबद्दल माहीत नाही, पण लग्न केले तेव्हा मुस्लिमच होते. त्यांनी दाखवलेली कागदपत्रे ही लग्नापूर्वीची आहेत. लग्नानंतरची त्यांनी दाखवलेली नाहीत. त्यांच्या घरातही मुस्लिम प्रथा पाळल्या जात होत्या,’ असा दावा डॉ. कुरेशी यांनी केला आहे.
निकाहनामा खरा आहे; पहिल्या पत्नीचे स्पष्टीकरण
समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावणाऱ्या मौलाना मुझम्मील अहमद यांनी निकाहावेळी दोघेही मुस्लिम होते असा दावा केला होता. त्या दाव्याला डॉ. शबाना यांनीही आज दुजोरा दिला. निकाह लावल्यानंतर नवदांपत्यांना मौलानांकडून निकाहनामा दिला जातो. समीर यांचा निकाहनामा सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तो निकाहनामा खरा आहे असे डॉ. शबाना यांनीही स्पष्ट केले आहे.































































