चंद्रकांत पाटील यांनी 28 वेळा हे सरकार जाईल असे विधान केले, त्यांना बोलत राहू द्या! खासदार संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रकांत पाटील यांनी 28 वेळा सरकार जाईल असे विधान केले आहे. त्यांना बोलत राहू द्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी असे बोलणे गरजेचे आहे, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर लगावला.

गुढीपाडव्यापर्यंत नवीन सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाणार या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज समाचार घेतला. खासदार संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने हे सरकार जात नाही हे सर्वांना माहिती आहे. हे सरकार पुढचे 25 वर्षे टिकणार आहे.

पोलीसप्रमुख राहिलेल्या व्यक्तीने धोका आहे म्हणणे म्हणजे विनोद

परमबीर सिंह यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, शरद पवारांसोबत परमबीर सिंह प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रासारखे सुरक्षित राज्य नाही. पोलीसप्रमुख असलेल्या व्यक्तीने मला धोका आहे असे म्हणणे हा विनोद आहे, अशी टीका त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर केली.

पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे  होताहेत म्हणून बोलले असावेत

पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होत आहेत म्हणून बहुतेक त्याचेच झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत. म्हणूनच ते सरकार पडेल असे म्हणत आहेत. झोपेतून जागे व्हा एवढेच मी चंद्रकांत पाटलांना सांगू शकतो, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला.