
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुलांना शाळेत सोडण्याकरता घराबाहेर पडणाऱ्या महिलांनो, सावधान! मुलांना शाळेत ने-आण करण्याच्या नादात गाफील राहून घराबाहेर पडू नका. समता नगर पोलिसांनी अशा चोरटय़ाला अटक केली आहे, जो सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात चोऱ्या करतो. इब्राहिम बहरुद्दीन शेख असे त्याचे नाव आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
इब्राहिम हा पूर्वी डोंगरीला राहत होता. एका सराईत चोरटय़ासोबत पूर्वी तो सहाय्यक म्हणून काम करायचा. त्याच्या मृत्यूनंतर इब्राहिम हा चोऱया करू लागला. इब्राहिमने काही दिवसांपूर्वी कांदिवली पूर्व परिसरात दिवसाढवळ्या चोरी केली होती. तक्रारदार महिला या मुलाला शाळेत आणण्याकरता गेल्या होत्या. त्याचा फायदा घेत इब्राहिमने त्या महिलेच्या घरातून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. महिला घरी आली तेव्हा हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने याची माहिती समता नगर पोलिसांना सांगितली. चोरी प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन आंधळे यांचे पथक करत होते. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून इब्राहिमला नालासोपारा येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. इब्राहिमविरोधात माटुंगा, ताडदेव, शिवाजी पार्क, डी.बी. मार्ग, व्ही.पी. रोड, दादर, भायखळा, बोरिवली, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात 17 गुन्हे दाखल आहेत.
11 ते 2 वेळात करायचा चोऱ्या
इब्राहिम हा चोऱया करण्याकरता नालासोपारा येथून कांदिवली परिसरात यायचा. ज्या इमारतीत सुरक्षा रक्षक नाहीत, जेथे सुरक्षा रक्षक आहेत, पण ते फारसे चौकशी करत नाहीत, त्या इमारतीत इब्राहिम हा शिरायचा. त्यानंतर तो रेकी करायचा. 11 ते 2 या वेळात बहुतांश महिला या मुलांना शाळेत ने-आण करण्याकरता घराबाहेर पडतात. शाळेत मुलांना ने-आण करण्याकरता महिला या गडबडीत असतात. गडबडीत त्या घरात फारशी आवराआवर करत नाहीत, कपाटांना चाव्या लावून जात नाही. त्यामुळे सहज चोऱया करता येतात, अशी कबुली इब्राहिमने पोलिसांना दिली.
पंधरा दिवसाआड चोरी
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून इब्राहिम हा एखाद्या ठिकाणी चोरी केल्यानंतर 15 दिवस त्या परिसरात फिरकत नसायचा. वातावरण शांत झाले असेल असे त्याला वाटत असायचे. 15 दिवसांनंतर पुन्हा तो चोरीकरता नालासोपारा येथून मुंबईमध्ये यायचा. तर दिवसाला एकतरी चोरी करायची, असे ठरवून घरातून बाहेर पडत होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.



























































