टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांतांकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

सध्याची दुष्काळी परिस्थिती व पिण्याच्या पाण्याची टंचाई विचारात घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांकडे असलेले अधिकार आता संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन आदेश गुरुवार 29 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.

या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यात व राज्यातील 151 तालुक्यामध्ये आणि 268 महसूल मंडळांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व ठिकाणी शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. त्यानुसार या परिसरात विविध उपाय योजना लागू करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. हे टँकर्स मंजूर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. सध्या तीव्र होत जाणारी दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा टँकरद्वारे सुरू करण्याच्या होणार्‍या मागण्या, येणारे प्रस्ताव आणि त्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीची मोहोर या सर्व प्रक्रियेत होणारा विलंब लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांकडे असलेले टँकर मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे आदेश 29 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात 237 टँकरद्वारे सुमारे चार लाख लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जिल्हा प्रशासनाद्वारे सुरू आहे.