देवली येथे अनधिकृत वाळू रॅम्प महसुलने हटवले

349

बेकायदा वाळू उत्खनन प्रकरणी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. कर्ली खाडी किनारी देवली येथे वाळू उखनन वाहतूक साठी उभारण्यात आलेले 27 अनधिकृत रॅम्प हटवण्यात आले. तहसीलदार यांच्या उपस्थितीत महसूल पथकाने ही कारवाई केली.

तहसीलदार पाटणे यांनी आठ दिवसांपुर्वी कालावल खाडी किनारी बांदिवडे, कोईल गावातील अनधिकृत वाळू उत्खनन करणारे रॅम्प व परप्रांतीय कामगार राहत असलेल्या झोपड्या नष्ट करण्याची कारवाई केली होती.

कर्ली खाडीतही देवली भागात चोरट्या पद्धतीने बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी तहसीलदार यांनी देवली येथे कारवाई केली. कारवाई पथकात डी. एस. सावंत, अरुण वनमाने, मंडळ अधिकारी निपाणीकर, तलाठी रवी तारी, दिपक शिंगरे व कोतवाल हरी देऊलकर हे सहभागी झाले होते.

दरम्यान 4 महिने वाळू लिलाव रखडले आहेत. दुसरीकडे बांधकामासाठी वाळूची मागणी असल्याने चोरट्या पद्धतीने वाळू उखनन सुरू आहे. त्यामुळे शासनाचा महसुलही बुडत आहे. तरी लवकरात लवकर वाळू पट्ट्यांचे लिलाव व्हावेत अशी मागणी केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या