संदेशखळी प्रकरण – शाहजहान शेखला 55 दिवसानंतर अटक, ‘ईडी’च्या पथकावरील हल्ल्यानंतर झालेला फरार

पश्चिम बंगालमधील संदेशखळी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख (वय – 53) याला अटक करण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी शाहजहान शेख याला बुधवारी रात्री मिनाखान भागातून बेड्या ठोकल्या. त्यानंतर गुरुवारी सकाळी 5 वाजता त्याला बशीरघाट पोलीस स्थानकातील तुरुंगात ठेवण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिनाखानचे पोलीस अधिकारी अमीनुल इस्लाम खान यांनी शाहजहान शेखच्या (Sheikh Shahjahan) अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ईडीच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. अखेर उत्तर 24 परगना जिल्ह्यातील मिनाखान भागातून त्याला अटक करण्यात आली. येथील एका घरामध्ये तो लपून बसला होता.

शाहजहान शेख हा तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेता आहे. पश्चिम बंगालमधील कथित रेशन घोटाळ्याप्रकरणी 5 जानेवारी रोजी ईडीचे पथक शाहजहानची चौकशी करण्यासाठी त्याच्या गावी पोहोचली होती. मात्र गावकऱ्यांनी ईडीच्या पथकावर हल्ला केला होता. तेव्हापासून ईडी सातत्याने शाहजहानला समन्स बजावत आहे, परंतु या हल्ल्यापासून तो फरार झाला होता आणि गेल्या 55 दिवसांपासून बंगाल पोलीस त्याचा शोध घेत होती.

ईडीच्या हल्ल्यानंतर शाहजहान आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत आला होता. संदेशखळीतील महिलांनी शाहजहान याच्यावर जमीन बळकावल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. त्यानंतर या भागात मोठे आंदोलन सुरू झाले होते. तरीही शाहजहान याला अटक करण्या आली नव्हती. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.

26 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने शाहजहान शेख याच्या अटकेला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावत 50 दिवसानंतरही त्याला अटक का होत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला होता आणि त्याला 72 तासात अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर बुधवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.