मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>संध्या शहापुरे

मरणं प्रकृति शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुद्धैः। क्षणमप्यवतिष्ठते श्र्वसन् यदि जन्तुर्ननु लाभवानसौ।।

कालिदासांचा रघुवंशातील हा श्लोक आहे. त्यामागील कथा अशी की, एक दिवस राजा अज आणि त्यांची पत्नी इंदुमती उद्यानात फिरत असतात. अचानक इंदुमती कोसळून पडते. ते दोघे तरुण आणि एकमेकांवर निरातिशय प्रेम करणारी राजा राणी असतात. इंदुमतीच्या अकस्मात निधनाने अज राजा अत्यंत शोकाकुल होतो. बेभान होतो. कोणीही त्याचे सांत्वन करू शकत नाही. राजाला झालेल्या अपरिमित दुःखाची वार्ता ऐकून त्याचे गुरु ऋषी वशिष्ठ यांनी अज राजाला पाठवलेला हा संदेश म्हणजे वरती उद्धृत केलेला श्लोक आहे. त्याचा अर्थ असा – मरण ही शरीरधारकांची प्रवृत्ती आहे आणि जीवन ही विकृती आहे असे ज्ञानी म्हणतात. एखादा जीव श्वास घेऊन एक क्षणभर जरी जगला ,तरी तो त्याचा लाभच आहे. आपल्याला दुर्लभ मानव जन्म मिळाला आहे. त्याचे काही उद्दिष्ट आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी कर्तव्य पार पाडलीच पाहिजेत. यासाठी समर्थ म्हणतात. `अशी माणसांची माया लावून घेऊ नका. लोभ ममत्व ठेवू नका आणि ममत्वामुळे शोक ही होऊ देऊ नका. नाहीतर केवळ मनस्ताप होईल आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावे लागेल.