
संगमनेर संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असणारी आणि रोमांचक अशी पेटत्या कठ्यांची यात्रा कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर या वर्षी मोठय़ा उत्साहात पार पडली. अकोले तालुक्यातील कौठवाडी या गावात ही यात्रा भरते.
जुन्या जाणत्यांच्या मते, हे बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील आहे. शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हा लोक सैरावैरा पळू लागले. त्यावेळी काही लोक राजूर तालुक्यातील कौठवाडी येथे आले. येताना आपला दगडरूपी देव घेऊन आले. नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जाऊ लागले, तेव्हा लहानसा दगड काही केल्याने हलेना. तेव्हा हा प्रांत जहागिरीखाली होता. तेथील जहागिरदाराने भोईर आणि भांगरे यांना कसण्यास जमीन देत येथेच स्थायिक होण्यास सांगितले. तेव्हापासून येथे बिरोबाची पूजा करण्यात येते. बिरोबाला नवस बोललेले भाविक डोक्यावर मडके (कठे) घेतात. मडक्याला छिद्रे पाडून त्यात उकळलेले तेल टाकतात. त्यानंतर नवस फेडण्यासाठी हे पेटते कठे डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यावेळी बिरोबाच्या नावाने घोषणा दिल्या जातात. हे रोमांचकारी दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून मोठय़ा संख्येने भाविक या ठिकाणी आलेले असतात.
कोरोनानंतर दोन वर्षांनी ही यात्रा भरल्याने या वर्षी ही संख्या मोठी होती. त्यामुळे डोक्यावर पेटते कठे घेतल्यानंतरचे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते. गावात श्री बिरोबा देवाचे मंदिर आहे. कठय़ाच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. नगर, पुणे, संभाजीनगर, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे यात्रेसाठी गर्दी केली होती. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला ‘कठा’ लावून नवस बोलला जातो. हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा बंद होती. यंदा त्यात भर पडून 91 कठे पेटविले होते. भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती दत्ता भोईर यांनी दिली. पुजारी भोईर यांना बिरोबाच्या पूजेचा मान मिळाला. साकीरवाडी येथून मानाच्या कठीचे आगमन झाले. पुजाऱयाच्या अंगात येताच कठे पेटले व मोठा अग्नीचा भडका झाला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेटलेले कठे आले. ‘बिरोबा की जय’ म्हणत मंदिराभोवती पाच फेरे मारून भाविकांनी नवस फेडले.
कठा म्हणजे काय?
कठा म्हणजे मडक्याची घागर. मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर, साग, चंदन अशी विविध प्रकारची लाकडे व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात. त्यात गोडे तेल टाकून चांगली भिजवितात. घागरीच्या चोहोबाजूंनी पांढरेशुभ्र कापड गुंडाळून वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात. हे कठे बिरोबा मंदिरात ठेवतात. साकीरवाडी येथून सात वाजता मानाची काठी येते व ‘बिरोबा की जय’ अशा घोषात ढोल-ताशांच्या गजरात कठे पेटविले जाऊन यात्रेला सुरुवात होते. मंदिराभोवती उघडय़ा अंगाने, डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेले तेल, डोक्यावरचा अग्नी अशा वातावरणात हे दृश्य पाहणाऱयांच्या अंगावर काटा येतो.



























































