
संगमनेर शहरहद्दीत चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच असून, आता उपनगरांमध्येही चोरटय़ांची दहशत पसरली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील गोल्डन सिटी येथे घरफोडी करून चोरटय़ांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उपनगरांतील काही सीसीटीव्हींमध्ये चोरटय़ांच्या हालचाली कैद झाल्या आहेत.
संगमनेर शहरात दरोडेखोरी, घरफोडीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मात्र, पोलिसांकडून कुठल्याही प्रकारे तपासात यश मिळत नसल्याचे आढळून आले आहे. गोल्डन सिटीमध्ये एका बंद घरातून चोरटय़ांनी सव्वा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि आठ हजार रुपये रोकड चोरून नेली. नीलेश बादशहा रहाणे (रा. रायतेवाडी, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. तर, दुसऱया एका घरात चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तेथे काही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, गोल्डन सिटी, अरगडेमळा, गुंजाळवाडी शिवार, हॉटेल ‘स्वदेश’मागील रहिवासी बंगल्यांच्या परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ सुरू आहे. हॉटेल ‘स्वदेश’च्या मागे असणाऱया कॉलनीमध्ये पाच-सहा दरोडेखोर हातात लोखंडी गज आणि काठय़ा घेऊन फिरत होते. त्यांना पाहिलेल्या एका तरुणावर हे सगळे धावून गेले. मात्र, त्याने आरडाओरडा केल्याने चोरटय़ांनी पळ काढला.

























































