संगमनेर तालुक्यातील 108 गावे झाली कोरोनामुक्त, 41 गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेत प्रशासनाने प्रत्येक गावात राबविलेल्या प्रभावी उपाययोजना, घरोघर तपासणी, तातडीचे विलगीकरण यांसह तालुक्यात नागरिकांच्या झालेल्या सर्वाधिक कोरोना टेस्ट यामुळे 108 गावे कोरोनामुक्त झाली आहेत, तर 41 गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.

संगमनेर तालुक्यात नगर जिल्ह्यातून सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या. याचबरोबर घरोघर नागरिकांची  तपासणी करण्यात आली. गावागावांत ग्राम आरोग्यरक्षक दलातील युवकांनी कार्यक्षमपणे काम करून काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण केले. विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करून नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. या ‘संगमनेर पॅटर्न’मुळे कोरोना लढय़ाचे आदर्शवत मॉडेल तयार झाले. देवकौठे ते बोटा असा मोठा विस्तीर्ण असलेल्या संगमनेर तालुक्यात 171 गावे व 263 वाडय़ा-वस्त्या आहेत. संगमनेर शहरात कोपरगाव, राहाता, जुन्नर, पारनेर, अकोले, सिन्नर या तालुक्यांमधून अनेक नागरिक कोरोना उपचारांसाठी संगमनेरात येत होते. ग्रामीण रुग्णालय व कॉटेज हॉस्पिटलकरिता चार ऍम्ब्युलन्स, पाच बायपॅप मशीन, तालुकास्तरावरील पहिले आरटीपीसीआर मशीन, दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांसह अनेक आधुनिक सुविधा वाढविण्यात आल्या. याचबरोबर लसीकरणासाठीही विशेष मोहीम राबवली गेली.

कोरोनाच्या लढय़ात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरीया, डॉ. राजकुमार जराड, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, मुकुंद देशमुख, सुनील पाटील, मांडवकर यांसह प्रशासनातील विविध अधिकाऱ्य़ांसह विविध शासकीय कर्मचाऱ्य़ांनी अहोरात्र काम केले.