
प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱया दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शनिवारी रात्री मार्केटयार्ड परिसरात अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 25 हजारांची सुगंधी तंबाखू, तसेच पाच लाखांच्या दोन चारचाकी असा सात लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमोल प्रकाश चिपरे (वय 35, रा. काननवाडी, ता. मिरज) आणि असिफ चाँदसाहेब मुलाणी (वय 34, रा. दत्तनगर, पटवर्धन कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शासनाने गुटखा, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी अशा पदार्थांची विक्री, तसेच वाहतुकीवर बंदी घातली आहे. तरीही छुप्या मार्गाने बहुतांशी ठिकाणी याची विक्री सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर पोलीस दलाच्या कारवाईला वेग आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गस्त वाढविली आहे.
शनिवारी (11 रोजी) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास महावीर उद्यान मार्केटयार्डजवळ गस्त सुरू असताना दोन वाहने संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पथकातील कर्मचाऱयांच्या लक्षात आले. त्यांनी दोन्ही चारचाकी वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा असल्याचे आढळले. पोलिसांनी सव्वादोन लाखांची सुगंधी तंबाखू जप्त केली. तसेच दोघांना अटक केली. त्यांच्याकडील दोन वाहनेदेखील ताब्यात घेण्यात आली. घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






























































