
कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने जिह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे आटपाडी, जत, पलूस आणि शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयांत सुरू असणारे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
आटपाडीसह सांगली जिह्यात कोरोनाचा फैलाव झाल्यापासून रुग्णांची संख्या अधिक आहे. सांगली जिह्यात सोमवारअखेर तब्बल 47 हजार 532 इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोरोनाने आत्तापर्यंत 1728 लोकांचा मृत्यू जिह्यात झाला आहे. मध्यंतरीच्या कालावधीत कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी लाभदायक ठरला; परंतु अद्यापही कोरेनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कायमच आहे. परंतु हे प्रमाण कमी असल्याने प्रारंभी कोविड केअर सेंटर प्राशासनाने बंद केले. फक्त तालुका पातळीवरील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू होते. आता हे एकमेव सेंटरदेखील जिह्यातील 4 तालुक्यांत बंद करण्याचे आदेश सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी काढले आहेत.
जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत ज्या रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या अतिशय कमी किंवा शून्य आहे, अशा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णसेवेची गरज लक्षात घेऊन नॉन कोविड रुग्णसेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
त्यानुसार आटपाडी ग्रामीण रुग्णालय, जत ग्रामीण रुग्णालय, पलूस ग्रामीण रुग्णालय आणि शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय नवीन रुग्णालयांना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिले आहेत. दरम्यान, आटपाडी शहरासह तालुक्यात डीसीएचसी बंदचे आदेश दिलेल्या दिवशीच म्हणजे सोमवारी 10 कोविडबाधित आढळले आहेत.
आटपाडीसह जिह्यातील डीसीएचसी केंद्रांनी कोविडमध्ये भरीव योगदान दिले आहे. शिवाय सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. आता आटपाडी तालुक्यात अद्यापि रुग्ण उपचार घेत असताना आणि दररोज रुग्ण आढळत असल्याने त्यांना मिरजेला जाऊन उपचार घेणे गैरसोयीचे होणार आहे. अशा स्थितीत ग्रामीण रुग्णालात कोविड सेंटर सुरूच ठेवावे, अशी मागणी होत आहे.



























































