
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यंदाच्या महापुरात नुकसान झालेल्यांसाठी तातडीने भरीव मदत केली आहे. याशिवाय महापुराचे योग्य नियोजन केल्यामुळे मोठी हानीही टळली आहे. असे असतानाही भाजपचे नेते गोबेल्स नीतीचा अवलंब करून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्याकडे दोन वर्षे सत्ता नसल्याने त्यांची अतृप्त आत्म्यासारखी अवस्था झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगलीतील चक्का जाम आंदोलन असल्याचा आरोप काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने यंदा महापुराबाबत आधीच गांभीर्याने दखल घेतली होती. नद्यांचे पाणी वाढू नये, यासाठी धरणांतील पाण्याचे योग्य नियोजन केले होते. कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार त्या राज्यानेही पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले होते. या सर्व नियोजनामुळेच कृष्णा, वारणा व अन्य नद्यांचे पाणी लवकर ओसरले. त्यामुळे मोठे संकट टळले. सांगली शहर आणि आसपासच्या गावांत पाणी येऊ नये आणि आले तर लोकांना जास्त हानी पोहचू नये, यासाठी त्यांना वेळीच बाहेर जायच्या सूचना करण्यात आल्या होत्या. ज्यांचे स्थलांतर केले, त्यांच्या राहण्याची, जेवण्याची आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनीही लोकांच्या पाठीशी राहणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम हे सातत्याने पुराची दखल घेत होते, अहोरात्र मदतकार्य करत होते. महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण आणि शहरी हा फरक न करता सरसकट मदत केली आहे. आधीच्या सरकारसारखा फरक केला नाही. स्थलांतरित झालेल्यांना त्यावेळी मदत मिळाली नव्हती; पण यावेळी स्थलांतरित झालेल्यांना दहा हजार रुपयांची मदत केली आहे. टपरीधारकांनाही त्यांनी मदत केली नव्हती. यावेळी टपरीधारकांना दहा हजार रुपये देण्यात आले. नुकसान झालेल्या सगळ्यांचा महाआघाडी सरकारने विचार केला आहे. तरीही भाजपचे जिह्यातील नेते लोकांची फसवणूक करत आहेत.
महाविकासआघाडी सरकारने मदतीची रक्कम थेट लोकांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. आतापर्यंत 66 कोटी रुपये लोकांच्या थेट खात्यावर जमा झाले आहेत. भाजप सरकारच्या काळात जिह्यात 50 कोटी रुपयांची मदत वाटप करण्यात आली होती. त्यामुळे भाजप नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे. भाजपकडे दोन वर्षे सत्ता नाही, त्यामुळे त्यांच्या नेत्यांची अतृप्त आत्म्यासारखी अवस्था झाली आहे. त्यामुळे सरकारवर टीका करत असल्याचेही पाटील म्हणाले.



























































