
आर्थिक देवाणघेवाणीतून डोक्यात चाकूने वार करून आणि डोक्यात दगड घालून एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना विश्रामबाग परिसरातील दत्तनगर परिसरात सोमवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यातही घेतले आहे.
दिलीप प्रभाकर शिरगुरकर (वय 44, रा. सिद्धेश्वर टॉवर, धामणी रोड, विश्रामबाग) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वैष्णवी दिलीप शिरगुरकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलीप शिरगुरकर हे सुरुवातीला मार्केटिंगचा व्यवसाय करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय बंद केला होता. यानंतर ते कोठेही कामासाठी जात नव्हते. त्यातूनच दिलीप यांना दारूचे व्यसन जडले होते. रविवारी रात्री ते घरातून बाहेर पडले ते आलेच नाहीत. सोमवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग परिसरातील 80 फुटी रोडवरील रौनक शहा यांच्या बांधकामाच्या ठिकाणी असणाऱया पत्र्याच्या शेडजवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, कुंभार, वर्धन यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली असता दिलीप शिरगुरकर यांना दारूचे व्यसन होते. त्यातूनच त्यांनी अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.




























































