
जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड खूनप्रकरणाचा मुख्य सूत्रधार भाजपचाच नगरसेवक उमेश सावंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उमेश सावंत पसार झाल्याने खुनाचे कारण अद्यापि स्पष्ट होऊ शकले नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण (वय 27, रा. समर्थ कॅलनी, जत), निकेश ऊर्फ दाद्या दिनकर मदने (वय 24, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), आकाश सुधाकर व्हनखंडे (वय 24, रा. सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय 27, रा. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जत-शेगाव रस्त्यावरील एका शाळेजवळ शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास कारमधून निघालेल्या माजी नगरसेवक विजय ताड यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर ताड घराच्या दिशेने पळून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून तसेच डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच, अधीक्षक डॉ. तेली यांच्यासह एलसीबीच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एलसीबीसह स्थानिक पोलीस ठाण्याची पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आली होती.
तपासादरम्यान सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ बबलू चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे जतमध्ये ठाण मांडून होते. संशयित बबलू चव्हाण हा कर्नाटकातील गोकाक येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने गोकाक येथे छापा टाकून बबलू चव्हाणसह अन्य संशयितांना ताब्यात घेतले. रविवारी रात्री उशिरा संशयितांकडे पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी कसून चौकशी केली. त्यावेळी बबलू चव्हाण याने उमेश सावंत याच्या सांगण्यावरून हा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सर्व संशयितांना अटक करण्यात आली. या खुनाचा मुख्य सूत्रधार उमेश सावंत याच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आल्याचे डॉ. तेली यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश शिंदे, जतचे निरीक्षक राजेश रामाघरे, सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, संदीप नलवडे, प्रकाश पाटील, चेतन महाजन, प्रशांत माळी, दीपक गायकवाड, कुबेर खोत, सचिन धोत्रे, जितेंद्र जाधव, आमसिद्धा खोत, संजय कांबळे, सोहेल कातिर्यानी, वैभव पाटील, उदय माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
तिघेजण रेकॉडर्वरील गुन्हेगार
अटक केलेल्या आरोपींपैकी तिघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. बबलू चव्हाण याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. निकेश मदने हाही सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत मारामारी असे चार गुन्हे दाखल आहेत. आकाश व्हनखंडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे.
संशयितांनी आठ दिवस केली होती रेकी
ताड यांचा खून करण्यापूर्वी ताड यांनी आठ दिवस त्यांच्या हालचालींची रेकी केली होती. ताड यांच्या घराजवळ असलेल्या शाळेजवळ आठ दिवस ते रेकी करत होते. त्यावेळी शाळेच्या बसचालकाला त्याचा संशय आल्याने त्याने मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढले होते. पोलिसांच्या चौकशीत ते रेकॉर्डिंग पुढे आले. त्यामुळे हा खून बबलू चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. खुनानंतर दोनच दिवसांत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.



























































