नादच खुळा! घरच्या घरी बनवली मिनी फोर्ड, सांगलीच्या अशोक आवटी यांचा आविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवराष्ट्रे येथील दत्तात्रेय लोहार यांची जुगाड जिप्सीनंतर आता आणखी एक गाडी चर्चेत आली आहे. भंगारातील साहित्याचा वापर करून सांगलीतील अशोक आवटी यांनी मिनी फोर्ड तयार केली. अवघ्या 30 हजार रुपयांत तयार केलेल्या या फोर्ड गाडीत आवटी कुटुंबासह ऐटीत फिरतात.

कर्नाळ रस्त्यावर काकानगरमध्ये अशोक आवटी यांचे गॅरेज आहे. त्यांनी जुगाड करत भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून गाडी तयार केलेय. ही गाडी म्हणजे 1930 सालच्या फोर्ड गाडीचे मॉडेल आहे. ही फोर्ड गाडी आकर्षणाचा विषय ठरलीय.

भन्नाट डोकं चालणाऱया आवटी यांनी यापूर्वी आपल्या घरगुती गरजेसाठी छोटी पवनचक्की तयार केली होती. ही पवनचक्की चांगलीच गाजली होती. त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी घरात एक चारचाकी असावी असे त्यांनी स्वप्न पाहिले. सातवी पास असलेल्या आवटी यांनी लॉकडाऊनच्या काळात त्यांचे स्वप्न सत्यात उतरले. एखाद्या रिक्षेप्रमाणे हँड किकवर सुरू होणारी गाडी पेट्रोलवर चालते. 30 किमी इतके मायलेज देते. ही अनोखी मिनी फोर्ड रस्त्यावर धावली की साऱयांचे लक्ष वेधून घेते.

दोन वर्षांच्या मेहनतीला यश

गेल्या काही वर्षांपासून गॅरेजचे काम करत असताना काहीतरी नवीन करण्याकडे अशोक आवटी यांचा ओढा होता. त्यांनी दोन वर्षे मेहनत घेऊन चारचाकी बनवली. भंगारातील एमएटी गाडीचे इंजिन आणि रिक्षाचे हब आणि आणखी काही पार्टचा जुगाड करून, लोखंडी पत्रा आणि अँगलपासून ही फोर्ड गाडी बनवली. गाडीला एलईडी लाईट, इंडिकेटर, हॉर्न आहेत. रिव्हर्स गियरसाठी या गाडीला रिक्षाचा गियरबॉक्स बसवला आहे. स्टेअरिंग त्यांनी स्वतः बनवलंय. तिचे वजन 100 किलो असून त्यात तीन ते चार जण सहज प्रवास करू शकतात.