
सामना ऑनलाईन, मुंबई
सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरात अजूनही अनेकजण अडकलेले आहेत. या लोकांच्या सुटकेसाठी नौदलानेही पथके पाठवली आहेत. शुक्रवारपर्यंत नौदलाने 26 पाठवली होती. शनिवारी आणखी 15 पथके पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पथके विशाखापट्टण येथून रवाना झाली आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी नौदलाच्या पथकांचा वापर केला जाणार आहे.
कोल्हापुरात 4 ऑगस्टपासून शुक्रवारपर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस झाला आहे तर सांगलीमध्ये याच काळात सरासरीच्या 223 टक्के पाऊस झाला आहे. साताऱ्यात याच काळात सरासरीच्या 181 टक्के पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 8, सांगली जिल्ह्यात 4 असे एकूण 12 तालुके बाधित झाले आहेत. कोल्हापूरमध्ये 239 गावे, सांगलीत 90 गावे अशी एकूण 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. या बाधित गावांमध्ये आतापर्यंत प्रशासन, लष्कर, नौदल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या मदतीने आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत भारतीय नौदलाची 14 पथके कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये 12 पथके कार्यरत होती. या सर्व पथकांकडे मोठ्या बोटी असून अत्याधुनिक साधने आणि विशेषज्ञांचा देखील समावेश आहे. राज्य शासनाने सैन्याकडे विनंती करुन बचाव पथकाला डोनीअर विमानाद्वारे पूरग्रस्त भागात सोडण्याचे काम केले होते. पूरग्रस्त भागात सेनादलाचे 8 कॉलम कार्यरत असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 4 कॉलम तैनात आहेत. एका कॉलममध्ये 40 जवानांचा समावेश असतो.




























































