
गणेशोत्सवानंतर सांगली कृष्णा नदीकाठच्या घाटाची येथील निर्धार फाउंडेशनकडून स्वच्छता करण्यात आली. निर्धारचे राकेश दडाण्णावर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांचा सलग तीन दिवस या परिसरात राबता होता. प्लॅस्टिक, निर्माल्य असा शेकडो टन कचरा गोळा करून उचलण्यात आला. सरकारी घाटासह समर्थ घाट, त्रिशूल घाट, विष्णू घाटांची स्वच्छता करण्यात आली.
कोरोना काळानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला. घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोठय़ा दिमाखात गणरायाचे स्वागत केले व अनंत चतुर्थीदिवशी निरोपही घेतला. मात्र, त्या संपूर्ण गणेशोत्सवानंतर आपल्या सांगली नदीच्या कृष्णाकाठावर पडलेले निर्माल्य व कचरा एकत्र करून संपूर्ण घाट परिसर स्वच्छ करण्याचे काम राकेश दडाण्णावर व निर्धार फौंडेशनच्या युवकांकडून करण्यात आले.
राकेश दडाण्णावर म्हणाले की, पारंपरिक पद्धतीने आपली संस्कृती जपण्यासाठी सर्वस्तरातून सण-उत्सव मोठय़ा दिमाखात साजरे केले जातात. मात्र, हे सण पार पडल्यानंतर शहराची स्वच्छता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे गणेशोत्सव पार पाडल्यानंतर दुसऱयाच दिवशीच कृष्णा नदीकाठच्या संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली.
मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह विविध नागरिकांनी राकेश दडाण्णावर व निर्धार फौंडेशनच्या टीमचे कौतुक केलेले आहे. या अभियानात रोहित कोळी, मनोज नाटेकर, मानतेश कांबळे, अनिरुद्ध कुंभार, अजय पवार, संजीत पाटील, विनायक कोलप आदींसह युवकांनी सहभाग घेतला.
सांगली मनपाकडून 136 टन निर्माल्य संकलन
संपूर्ण गणेशोत्सवकाळात महापालिकेकडे तब्बल 136 टन निर्माल्याचे संकलन झाले, तर 1558 मूर्ती दान स्वरूपात जमा झाल्या आहेत. मनपा क्षेत्रात संपूर्ण उत्सवकाळात 41 हजार 268 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले असून, यापैकी 3287 मूर्ती या कृत्रिम तळ्यात, तर 8 हजार 143 मूर्ती विसर्जन कुंडात विसर्जित झाल्या आहेत. यासाठी मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके यांच्या सूचनेनुसार विविध विभागांचे 1430 कर्मचारी कार्यरत होते.



























































