सांगली जिल्ह्यात ‘लम्पी’चा कहर, जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धनचे नियोजन ठरतेय फेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लम्पी स्कीनचा फैलाव वाढतच असल्याने जिल्हा परिषद आणि राज्य पशुसंवर्धन विभागाचे नियोजन फेल झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल 347 जनावरे बाधित झाली असून, 9 जनावरांचा मृत्यू झाला. लम्पी रोखण्यासाठी 3 लाख 37 हजार 441 जनावरांना ‘लम्पी’ची लस टोचण्यात आली आहे. मात्र, संसर्ग थांबायला तयार नसल्याने लसीकरणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

सांगली जिह्यात मागील दोन महिन्यांपासून लम्पी स्कीनचा संसर्ग सुरू झाला आहे. लम्पीला रोखण्यासाठी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. जिह्यात गाय आणि बैल असे मिळून 3 लाख 37 हजार 441 जनावरांचे लसीकरण झाले असले, तरी लम्पी आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लम्पी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पशुसंवर्धन विभाग फेल झाल्याचे दिसून येते. लसीकरण आणि उपाययोजनांबाबत शेतकऱयांतून साशंकता व्यक्त केली जात आहे.

बुधवारी एका दिवसात लम्पीने कहर केला. एका दिवसात तब्बल 347 जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. तर सलग दुसऱया दिवशी 9 जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिवसेंदिवस लम्पीचा प्रसार वाढतच असल्याचे स्पष्ट झाले. आत्तापर्यंत जिह्यात तब्बल 3 हजार 609 जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. अद्यापही 2 हजार 259 जनावरांवर उपचार सुरूच आहेत. या रोगांमुळे आत्तापर्यंत 218 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर एक हजार 121 जनावरे आजारातून बरी झालेली आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त दररोज गावांना भेटी देत आहेत, मात्र त्याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे.

बाधित जनावरांची तालुकानिहाय संख्या ः

z मिरज तालुका 978, आटपाडी 367, पलूस 319, वाळवा 539, खानापूर 427, तासगाव 287, कडेगाव 94, कवठेमहांकाळ 164, जत 369, शिराळा तालुक्यात 39 अशी एकूण 3 हजार 609 जनावरांना बाधा झाली आहे, तर त्यापैकी 209 जनावरांचा मृत्यू झाला आहे.