सांगली पोलीस मुख्यालयाच्या नव्या इमारतीला आधुनिकतेसह ऐतिहासिक साज; सौरऊर्जेतून होणार वीजनिर्मिती; 300 झाडांची लागवड, लवकरच लोकार्पण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या नव्या इमारतीला आधुनिकतेसोबत ऐतिहासिक साज देण्यात आला आहे. नूतन इमारतीत पर्यावरणपूरक वास्तूसोबत ऐतिहासिक ठेवा जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संपूर्ण इमारतीत सौरऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. या परिसरात नव्याने 300 झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर इमारत बांधकामासाठी 15 हजार दगडांचा वापर करण्यात आला आहे. सध्या नव्या पोलीस मुख्यालयाची इमारत सज्ज झाली असून, लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

सांगली शहरात असणारी शासकीय कार्यालये आजही संस्थानकाळातील इमारतींमध्ये सुरू आहेत. जुने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, न्यायालय हे पूर्वी राजवाडा चौकात होते. या ठिकाणी अपुऱया पडणाऱया जागेमुळे विजयनगर येथे प्रशासकीय इमारत, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने बांधण्यात आले. विश्रामबाग चौकात असणाऱया जुन्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम 1961 साली करण्यात आले होते. या ठिकाणी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सायबर सेल, गोपनीय कक्ष, वायरलेस कक्ष यांच्यासह अनेक अधिकाऱयांची कार्यालये आहेत. काळ बदलत गेला आणि पोलीस खात्यातील विभागदेखील वाढत गेले. जुन्या दोन मजली इमारतीच्या खोल्या कमी पडू लागल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळून वर्षभरापूर्वी कामाला सुरुवात झाली होती.

मुख्यालयातील हॉकी स्टेडियममध्ये ही इमारत बांधण्यात आली. या भव्य इमारतीचे बांधकाम पाच हजार 244 चौरस मीटर आहे. संपूर्ण इमारतीत  सौरऊर्जेवर वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यालयाच्या छतावर उभालेल्या सोलर पॅनेलमधून 75 केव्ही वीजनिर्मिती होणार आहे. मुख्यालयात 70 केव्ही विजेचा वापर होणार आहे.

150हून अधिक खिडक्या

 पोलीस मुख्यालयाची नवीन इमारत बांधताना नैसर्गिक बाबींचा मोठा विचार करण्यात आला आहे. इमारतीमध्ये हवा खेळती राहावी, यासाठी 150हून अधिक खिडक्या लावलेल्या आहेत. यामुळे विजेचा कमी वापर होऊन इमारतीत मोठा प्रकाश पडण्यास मदत होणार आहे. इमारतीच्या संपूर्ण परिसरात 300 झाडे लावण्यात येणार आहेत. पाण्यासाठी जमिनीखाली एक लाख लिटर आणि टेरेसवर 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असणार आहे. पावसाचे पाणी वाया जाऊ नये, यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे.

ऐतिहासिक स्थळांची मिळणार माहिती

 ही इमारत ऐतिहासिक दिसावी, यासाठी इमारतीच्या दर्शनी भागात तब्बल 15 हजार काळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. कोल्हापूर जिह्यातील केरली गावामधून हे काळे दगड सांगलीत आणण्यात आले आहेत. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात पोलीस आणि कॉमन मॅन यांची प्रतिकृती साकारली आहे. त्याचबरोबर जिह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे, स्वातंत्र्यसैनिक, राजकीय इतिहास यांची माहिती देणारी चित्रेही लावली आहेत.