सांगली, सातारा जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध, आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्ष, तर जयश्री पाटील उपाध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे शिराळाचे आमदार मानसिंगराव नाईक, तर उपाध्यक्षपदी जयश्री मदन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड पार पडली. कोरोनामुळे दीड वर्षे लांबलेली जिल्हा बँकेची निवडणूक पंधरा दिवसांपूर्वी पार पडली. महाआघाडीचे 17 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला अध्यक्षपद तर उपाध्यक्ष पद काँग्रेसला मिळणार होते. गेल्या काही वर्षांपासून आमदार नाईक यांच्या अध्यक्षपदाला हुलकावणी मिळाली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही आमदार नाईक यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शवला होता. काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी जयश्री पाटील, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचे नाव चर्चेत राहिले; परंतु राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जयश्री पाटील यांचे नाव निश्चित केले.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून आमदार नाईक यांचा अर्ज भरण्यात आला. नाईक यांना मावळते अध्यक्ष दिलीपतात्या पाटील सूचक तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या अर्जाला सूचक म्हणून पृथ्वीराज पाटील यांनी, तर भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक करे यांनी निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

या निवडीप्रसंगी ज्येष्ठ संचालक आमदार मोहनराव कदम, महेंद्र लाड, सुरेश पाटील, विशाल पाटील, बी. एस. पाटील, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, सत्यजित देशमुख, चिमण डांगे, वैभव शिंदे, राहुल महाडिक, मन्सूर खतीब, बाळासाहेब होनमोरे, अनिता सगरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील आदी उपस्थित होते.

भाजपचा न मागता पाठिंबा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्या पॅनेलमध्ये झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत सत्ता मिळवली. भाजपला अवघ्या चार जागांवर समाधान लाभले. मात्र, बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकारी आणि आर्थिक संस्थेत महाविकास आघाडीला न मागता पाठिंबा दिला. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱयांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

तीन-दोन वर्षांचा फॉर्म्युला

जिल्हा बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आली असली, तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरला आहे. अध्यक्षपदाची पहिली तीन वर्षे राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे राहणार आहे. उर्वरित दोन वर्षांच्या कालावधीत अध्यक्षपद काँग्रेसला दिले जाणार असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.