कॅनव्हास अन् कुंचला फक्त मांजरींसाठी! संगमेश्वरच्या प्राची रहाटेची अनोखी कलाकृती

चित्रकाराच्या अंतर्मनाला जे काही सांगायचे असते तेच बऱयाचदा त्याच्या कलाकृतीतून व्यक्त होते. मांजरांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर येथील युवा चित्रकार प्राची रहाटे हिने केवळ मांजरांचे बाह्याकार घेऊन आजवर पन्नासहून अधिक चित्रे रेखाटून रंगवली आहेत. यातीलच दोन तैलचित्रे पैसा फंडच्या आर्ट गॅलरीत आहेत.

प्राची जनार्दन रहाटे ही संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिशची विद्यार्थीनी. बालपणापासूनच तिला चित्रकलेची आवड. पुढे सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयात तिने कला शिक्षक पदविका आणि त्यानंतर रेखा आणि रंगकला पदविका प्राप्त केली. स्वभावाने नम्र असणाऱया प्राचीच्या बहुतांशी चित्रांमध्ये मांजरांचे विविध आकार पाहायला मिळतात. कलेच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या स्वतंत्र शैलीसाठी एखादी ‘थीम’ निवडण्यास सांगितले जाते. या वेगळ्या विषयातही प्राचीने मांजरांचीच निवड केली. एवढेच नव्हे तर जी.डी. आर्टच्या अंतिम वर्षातदेखील रचना चित्राच्या पेपरसाठी तिने मांजरांचेच विविध बाह्याकार रेखाटून एक अप्रतिम कलाकृती साकारली.

चित्रांमध्ये मांजर हा विषय का निवडलास, याबाबत विचारल्यावर प्राची म्हणाली, लहानपणी माझ्याकडून नकळत एका मांजराच्या पिलाला इजा झाली. बालपणी हातून घडलेली ही चूक सुधारणे शक्य नसले तरी ती घटना मला अस्वस्थ करत होती. त्यामुळे चित्ररुपी आदरांजली देत पापक्षालन करण्यासाठी मी कॅनव्हसचा आधार घेतला. चित्रांतून मांजरांप्रती दिली गेलेली अनोखी आदरांजली नक्कीच लक्षवेधक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या