
घरात खुंटीसोबत खेळत असताना अचानक अंगातील स्वेटरची दोरी खुंटीत अडकून फास बसल्याने नऊवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील अचकदाणी येथील माळीवस्ती येथे शनिवारी घडली आहे. सोहम नागनाथ शेंडे (वय नऊ) असे मयत मुलाचे नाव आहे.
नागनाथ शेंडे हे पत्नी, आई, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासमवेत माळीवस्ती येथे राहतात. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ते व त्यांची पत्नी मोलमजुरी करून उपजीविका करतात. सांगली जिह्यातील आटपाडी येथे सिमेंटच्या चौकटी बनवणाऱया कारखान्यात ते अनेक वर्ष काम करत होते. लॉकडाऊननंतर त्यांनी परिसरातच मोलमजुरी सुरू केली होती. शनिवारी दोघेही कामासाठी सकाळी लवकर घराबाहेर पडले होते. घरी सोहम व त्याची वयस्कर आजी असे दोघेच घरी होते.
थंडीचे दिवस असल्याने सोहमने अंगामध्ये स्वेटर घातलेला होता. घरातील पलंगाच्या वरील बाजूस असलेल्या मोठय़ा खुंटीशी तो खेळत होता. खेळताना अचानक स्वेटरमधील दोरी खुंटीत अडकली व सोहमला फास लागला. फास अवाळला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारील मित्र त्याला खेळायला बोलवण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीला आला. शेजारील शेतात काम करणारी आई धावत त्या ठिकाणी आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
दुसरीत असतानाच इंग्रजीत भाषण
– सोहम शेंडे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरातवस्ती चिकमहूद या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता. सोहम हा अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी होता. वाडीवस्तीवर अगदी ग्रामीण भागात शिकत असूनही त्याने इयत्ता दुसरीतच असताना इंग्रजीमध्ये भाषण केले होते, असे त्याचे वर्गशिक्षक बापू खरात यांनी सांगितले.


































































