
पैशांचा मोह कुणालाही आवरता येत नाही. माणूस कोट्याधीश असो किंवा फकीर, रस्त्यात पडलेली रोकड, सोने-नाणे किंवा मौल्यवान वस्तू सापडली तर तो पटकन खिशात टाकतो. पैशांचा हाच मोह आवरत चेन्नईतील कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. कचरा वेचणाऱ्या महिला एस. पद्मा यांना तब्बल 45 तोळे सोन्याचे दागिने सापडले. बाजारात याची किंमत 45 लाखांच्या आसपास आहे. मात्र त्यांनी प्रामाणिकपणे हा ऐवज पोलिसांच्या स्वाधिन केला. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एस. पद्मा या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी टी. नगर भागातील मुपाथू अम्मन कोईल परिसरात आपले स्वच्छतेचे काम करत होत्या. काम संपवून झाडी आणि हातमोजे जमा करण्यासाठी जात असताना त्यांना एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बेवारस बॅग पडलेली दिसली. कुतूहलापोटी त्यांनी ती बॅग उघडून बघितली तेव्हा अन् आतील ऐवज पाहून त्या अवाक झाल्या. बॅगेमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे सेट होते.
समोर लाखोंचे सोने पाहूनही त्यांच्या कोणतीही लालसा उत्पन्न झाली नाही. मोहाला बळी न पडता त्यांनी तातडीने आपल्या वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी थेट पाँडी बाजार पोलीस स्थानक गाठत दागिन्यांनी भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधिन केली.
सदर बॅग रस्त्यावर बेवारस पडली होती. ती उघडल्यावर मला त्यात सोन्याचे दागिने दिसले. माझ्या मनात त्यावेळी एकच विचार आला की, ज्या कुटुंबाचे हे दागिने आहेत त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. त्यांच्या कष्टाची कमाई त्यांना परत मिळावी एवढीच माझी इच्छा होती, असे एस. पद्मा म्हणाल्या.
…अन् मालकाचा शोध लागला
दरम्यान, पोलीस तपासादरम्यान दागिन्यांची ही बॅग एका सराफा व्यापाऱ्याची असल्याचे समोर आले. हा व्यापारी टी.नगरमध्ये आपल्या मित्रासोबत गप्पा मारत होता. गप्पांच्या ओघात त्यांने दागिन्यांची बॅग जवळच्याच हातगाडीवर ठेवली आणि तिथेच विसरून गेला. याबाबत व्यापाऱ्याने पोलीस तक्रारही दाखल केली होती. कचरा वेचणाऱ्या महिलेला सापडलेली बॅग आणि हरवलेली बॅग एकच असल्याची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी ती मूळ मालकाला परत केली. पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या एस. पद्मा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



























































